Talegaon Crime News : पिस्तुलाचा धाक धाकवून अशिक्षित महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न; पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन

एमपीसी न्यूज – पिस्तुलाचा धाक धाकवून अशिक्षित महिलेची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना तळेगाव -दाभाडे येथील शालन शिंदे यांच्या सोबत घडली आहे. याप्रकरणी त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शालन अनंता शिंदे यांनी निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, शालन अनंता शिंदे यांचे वडील साहेबराव बोरगे यांचे दिनांक 11 एप्रिल 2015 रोजी निधन झाले. त्यांची पुनावळे, तालुका -मुळशी येथे गट क्रमांक 41/1, 45/4, 46/3, 46/9 अशी वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांच्या निधनानंतर वारस नोंदीच्या बहाण्याने शिंदे यांच्या परिचयातील अनिल भांगरे या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क केला. भांगरे या इसमाने वारस नोंद करून देतो, असे सांगून पंधरा हजार रुपये आणि मिळकतीची मूळ कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्याने कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र बनविले.

दरम्यान, बराच काळ उलटून गेल्यानंतर वारस नोंदीच्या कामाचे काय झाले, या बाबत विचारणा करण्यासाठी शिंदे गेल्या, यावेळी अनिल भांगरे याने पिस्तूल काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पुन्हा या गावात दिसू नकोस, अशी धमकी दिली. भांगरे यांचे साथीदार राजेश लक्ष्मण दांगट, अभिजीत संजय सोनवणे, सलीम निजाम काझी यांनी शालन शिंदे यांना मारहाण केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जमिनी संबधित बनवलेली कागदपत्रे बनावट आहेत. त्याला माझी परवानगी नव्हती. भांगरे यांनी माझी फसवणूक केल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. शालन शिंदे तळेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता तेथील पोलिसांनी दमदाटी केली व तक्रार नोंदविण्यास नकार दिला. आता पर्यंत एकूण तीन वेळा अनिल भांगरे याच्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. जीवे मारण्याची धमकी देऊन, प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी भांगरे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शालन शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.