Talegaon Dabhade : सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी द्या – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) शहरात सातव्या दिवशी गणेश विसर्जन होते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने सातव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा पर्यंत वापरण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मंडळांचा उत्साह कमी झाला आहे. सातव्या दिवशी (सोमवार, दि. 25) ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत वापरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

Maval : रोटरी सिटीच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षार्थींना पुस्तक संच वाटप

आमदार शेळके यांनी मागणी पत्रात म्हटले की,मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव रुढी व परंपरेनुसार सात दिवसांचे असुन त्यानुसार सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील मानाच्या मंडळांचे गणपती हे एका पाठोपाठ एक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असुन मंडळांच्या संख्येमुळे विसर्जनास मध्यरात्रीपर्यंत वेळ लागतो.

आपल्या संदर्भिय आदेशान्वये गणेशोत्सव काळात पाचवा, सहावा, आठवा, नववा आणि दहावा या दिवसांमध्ये रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठीची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. परंतु तळेगाव दाभाडे शहरातील गणेश विसर्जन हे सातव्या दिवशी म्हणजे सोमवार (दि.25 ) रोजी आहे.

तरी कृपया, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे शहरातील गणेश विसर्जनासाठी ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 2000 मध्ये सोमवार दि.25 सप्टेंबर 2023 रोजी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मर्यादा शिथिल करण्यात येऊन रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.