Talegaon dabhade:  ‘कोरोना’ विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे सुरक्षा कवच द्या’ : विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोना विरोधात लढताना नगरपरिषदेतील कर्मचा-याबाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना सुरक्षा विमा कवच लागू करावे. 50 लाख रुपये आणि त्याच्या वारसास नगरपरिषदेत नोकरी देण्यात यावी. त्याबाबतच निर्णय घ्यावा,  अशी मागणी विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे. 

 याबाबत काकडे यांनी मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात  म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणूका केल्या आहेत.  हे कर्मचारी वेळेचे कोणतेही बंधन न पाळता जीवावर उदार होऊन काम करत आहेत. यापैकी एखाद्या कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या कर्मचा-यांना योग्य असे सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेमणूका केलेल्या कर्मचा-यांना विमा कवच लागू करावे.

पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिकेने कोरोना विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक कोटीचे विमा कवच दिले. त्याच धर्तीवर नगरपरिषदेतील कोरोना विरोधात लढणाऱ्या कर्मचा-यांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना नगरपरिषदेमार्फत सुरक्षा कवच म्हणून  50 लाख रुपये आणि त्यांच्या वारसास नगरपरिषदेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते काकडे यांनी केली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल,  असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.