Talegaon Dabhade : हभप माऊली कदम महाराजांनी सांगितले माणसाच्या सुखाचे गमक

एमपीसी न्यूज – इंदोरी येथील चंपाबाई पवार व ज्ञानोबा पवार यांच्या 19 व्या पुण्यस्मरणानिमित्त (Talegaon Dabhade) व मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांच्या अकराव्या मासिक श्रद्धांजलीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर उर्फ माऊली महाराज कदम यांनी माणसाच्या सुखी जीवनाचे गमक सांगितले. काही गोष्टी टाळल्यामुळे तर काही सवयी अंगिकारल्याने माणूस सुखी होतो याबाबत कदम महाराजांनी प्रबोधन केले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते पाटील,माजी आमदार विलास लांडे,माजी मंत्री बाळा भेगडे,उद्योजक विजय जगताप, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे,संचालक शिवाजीराव पवार, उद्योजक रामदास काकडे,भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, कोल्हापूरचे सभापती प्रदीप झांबरे, पांडुरंग खेसे,विठ्ठलराव शिंदे,प्रशांत ढोरे,श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीवन जगताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे, हे समजणे खूप आवश्यक आहे. परनिंदा,पर द्रव्य,आणि पर नारी या गोष्टी टाळल्यास जीवनात आनंदच आनंद आहे.असेही कदम महाराज यांनी सांगितले.

इंदोरी येथील चंपाबाई पवार व ज्ञानोबा पवार यांच्या 19 व्या पुण्यस्मरणानिमित्त व मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबरशेठ (Talegaon Dabhade) भेगडे यांच्या अकराव्या मासिक श्रद्धांजलीनिमित्त भंडारा लॉन्स येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज कुऱ्हेकर व इतर महात्म्यांचे संत पूजन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार राहता येथील प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान डांगे यांना, कृषिरत्न पुरस्कार शेलारवाडी येथील शंकरमामा शेलार यांना, उद्योगरत्न पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ उद्योजक बाळासाहेब काकडे यांना, समाजरत्न पुरस्कार पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक जयंत बागल यांना, तर नारी गौरवरत्न पुरस्कार चिंचोशीच्या सरपंच उज्ज्वलाताई गोकुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Dighi : दिघी आळंदी रोडवर जाळपोळ

कार्यक्रमात ह.भ.प. ज्ञानेश्वर उर्फ माऊली महाराज कदम यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. “एका हाती टाळ, एका हाती चिपळीया l घालिती हुंबरी एक वाहताती टाळीया ll” हा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी निवडला होता. त्यांनी जीवन जगताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे हे मार्मिक उदाहरण देऊन स्पष्ट केले.

परनिंदा, पर द्रव्य, आणि पर नारी या गोष्टी टाळल्यास जीवनात आनंदच आनंद आहे, असे त्यांनी विविध दाखले देत सांगितले. तर औषधांच्या वेळा जपाव्या,हक्काचे घर हवे, जेवण वेळेवर करणे, दररोज भजन आवश्यक आणि कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे भय आवश्यक आहे, या पाच गोष्टी आपल्या जीवनात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच माणूस सुखी राहू शकतो, असे सांगत त्यांनी आरोग्याचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर ढमाले व गुलाब वाघोले यांनी, तर मावळ भाजपचे माजी अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.