Talegaon Dabhade: ‘गौण खनिजाच्या उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी करुन गुन्हे दाखल करा’

Talegaon Dabhade: 'Investigate mineral extraction case and file charges' या प्रकरणात सहभागी असलेले मुख्याधिकारी, अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे, नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा तसेच या ठरावास अनुमोदन देणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करावी, दोषींवर कडक कारवाई करावी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या तळ्यातील गौण खनिजाच्या उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्याचबरोबर नगरपरिषदेला सुधारित दंड आकारणी करून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी माहिती अधिकार महासंघाचे सदस्य अनिल भांगरे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मावळचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनामध्ये, नगरपरिषदेने तळे विकासाच्या व सुशोभीकरणाच्या नावाखाली सर्वे नंबर 428 मधील तळ्यातील सुमारे 2 लाख ब्रास मुरूम, माती, वाळू , दगड काढून त्याची विक्री केली आहे. या बेकायदेशीर कृत्याबद्दल नगरपरिषदेस 79 कोटी 64 लाख 14 हजार दंड केलेला आहे. या सर्व प्रकरणाची उत्खननाची अत्याधुनिक यंत्राने तपासणी करून फेर आकारणी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या उत्खनन प्रकरणासंबंधित असलेले ठेकेदार, नगरपरिषदेतील वरिष्ठ अधिकारी, तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि उत्खननास मान्यता देणाऱ्या समिती सदस्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

तसेच या प्रकरणात सहभागी असलेले तत्कालीन मुख्याधिकारी, अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे, नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा तसेच या ठरावास अनुमोदन देणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भांगरे यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्यपाल यांच्यासह स्थानिक पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.