Talegaon Dabhade : कलापिनीच्या युवा कलाकारांचा रंगभूमीदिनाला मानाचा मुजरा

एमपीसी न्यूज- कलापिनीच्या नवीन रंगमंचावर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून कलापिनीच्या युवा कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले.

कलापिनीच्या गाजलेल्या संगीत चैती नाटकातील सुरेल नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याला जोड म्हणून ‘शब्दांचा हा खेळ मांडला ….ही विदुषक या चित्रपटातील नांदी अजिंक्य देशपांडे यांनी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर श्रीधर कुलकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या ‘गाभारा’ कवितेचे सादरीकरण केले, चेतन पंडित, हृतिक पाटील आणि मुक्त भावसार यांनी सादर केलेला ती फुलराणी या नाटकातील प्रवेश खूपच छान आणि कार्यक्रमाची उंची वाढवणारा होता.

अनुजा झेंड हिने सादर केलेले वीज म्हणाली धरतीला या नाटकातील स्वगत आणि ‘चार होत्या पक्षिणी…. हे नाट्यपद लक्षवेधक होते. श्रीधर, प्रतीक, हृतिक, चेतन आणि आदित्य या कलाकारांनी ‘होय साहेब’ या अभिवाचनातून आपल्या कसलेल्या वाचिक अभिनयाची चुणूक दाखविली. हरीश पाटील याची ‘मला शाळा शिकायचीय’ गावरान ढंगातील नाट्यछटा उत्स्फूर्त दाद मिळवून गेली.

देवाघरचे ज्ञात कुणाला… हे अजिंक्य देशपांडे याचे नाट्यपद खूपच भावले, मनोज काटदरे, अविनाश शिंदे आणि विपुल परदेशी यांनी कलापिनी मूक नाट्य महोत्सवात गाजलेले “रोबोला हेव्हा जाग येते…हे मूक नाट्य सादर करून उपस्थितांना भावूक केले.

विशाखा बेकेच्या समयोचित अभ्यासपूर्ण सूत्रसंचालनाने सगळ कार्यक्रम रंजक केला. कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांच्या आभार प्रदर्शन आणि मार्गदर्शना नंतर ‘सर्वात्मका सर्वेश्वरा…या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला प्रदीप जोशी (संवादिनी), अनिरुद्ध जोशी (तबला) याची साथसंगत लाभली. या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन चैतन्य जोशी, हेमंत आपटे, प्रतीक मेहता आणि कलापिनीच्या सर्व युवा कलाकारांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.