Talegaon Dabhade : साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवताहेत हे चिंताजनक- गणेश शिंदे

मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- निव्वळ साधनांमध्ये सुख नाही. साधनांमध्ये सुख असते, तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी झाले असते. साधनांवर आपले प्रभुत्व हवे, पण साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे उद्घाटन व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्याख्यानमालेत ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कार्यवाह रामदास काकडे, विलास काळोखे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.

गणेश शिंदे म्हणाले, “आयुष्य खूप सुंदर आहे. त्यासाठी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हरवत चाललेला आपापसातील संवाद ही आनंदी जीवनातला प्रमुख अडथळा आहे. जिथे संवाद नाही, तिथे आनंदाचा प्रश्नच येत नाही. लोक साधनांमध्येच सुख शोधू लागली आहेत. पण एक लक्षात घेतले पाहिजे, की साधनांमध्ये सुख असते, तर जगातील अनेक विकसित राष्ट्रे आज समाधानी दिसली असती. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. पण दुर्दैव हे की, आजची शिक्षणव्यवस्था ही गुणाधारीत बनली आहे. शिकायचे कशासाठी तर आनंदी राहण्यासाठी त्यातील नाविन्य कुठय? मराठी मधल्या ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी येत नाही. इंग्लिशमध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला इंग्रजी येत नाही फॉर्मॅलिटी म्हणून ग्रंथालय आहे. पण त्यातील पुस्तके कोणी वाचत नाहीत.

इतिहासातील मार्क पास होण्यासाठी. शिवाजी महाराज पाच मार्कासाठी, सगळंच मार्कासाठी झालेले आहे. आपण का शिकायचं हे ग्रॅज्युएशेन झालं तरी आपल्याला कळत नाही. आता काय करायचं….. महात्मा फुले म्हणायचे.. विद्यार्थी हा ज्ञानाभिमूक असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबाहेर डोकावून पाहायला हवे. वाचनालयांमध्ये विद्यार्थ्यांनी जाण्याची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबाहेरही जीवन समृद्ध करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. ज्ञानाचा अहंकार जगणे समृद्ध करू शकणार नाही. शिक्षणातून स्वाभिमानशून्य होणं अपेक्षित नाही”

गणेश शिंदे म्हणाले की, इतकं सुंदर जीवन जगा की समाजाला हेवा वाटला पाहिजे. स्वतःचं स्थान निर्माण करा. केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात येऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. अपयश येईल, पण अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण केल्यास आयुष्यात सुखच सुख आहे. प्रत्येक तरुणांनी नकारात्मक विचार संपूर्ण सोडून देऊन नव्या उमेदीने आपल्या भविष्याकडे पाहिले पाहिजे. विद्यार्थी हा फक्त अर्थार्जनासाठी शिक्षण घेणारा नसावा.

उद्योग व्यवसायाला पैसे लागत नाही तर हिम्मत लागते. कमालीचा आत्मविश्वास लागतो. आम्हाला जगणं सुंदर करायचे असेल तर आपला अहंकार बाजूला ठेवता आला पाहिजे. मै भी कुछ कम नहीं ! हा भाव आपल्यात असला पाहिजे. मग बघा जीवन किती सुंदर होईल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायला शिका. पोरांसाठी कमवण्यापेक्षा पोरांच्या मनगटात कमवण्याची ताकद निर्माण करा. प्रत्येकात वेगळेपण असते, ते ओळखता यायला हवे. स्वतःचे आयुष्य सुंदर करताना इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसेल, असे काम केले पाहिजे. गरिबीतही आनंद शोधता यायला हवा, असेही त्यांनी सांगितले. आजच्या काळात पैसे कमावणारा फक्त श्रेष्ठ समजला जातो. नोकऱ्यांसाठी पैशांचा बाजार भरतो आहे. हे चित्र विचित्र होत असल्याने समाज बदलणे आवश्यक आहे.

नव्या पिढीने आत्मविश्वासाने निवडलेल्या भवितव्याचा वेध घेणे जरूर आहे. आपल्याला निवडलेल्या क्षेत्रात पुढे आपले भवितव्य घडविण्यासाठी साधना करणे हेच जीवनाचे यश असते. साध्या साध्या गोष्टीतून आनंद घेता आला पाहिजे. प्रतिज्ञा एकदाच घ्यायची असते आणि आयुष्यभर लक्षात ठेवायची असते असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश शाह यांनी, पाहुण्यांचा परिचय डाॅ पी. व्ही खंदारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. एस पी भोसले, वीणा भेगडे यांनी केले तर आभार विलास काळोखे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.