Talegaon Dabhade : भाषा व संवादकौशल्य ही यशाची गुरुकिल्ली- प्राचार्य डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज- आपली भाषा ही पाण्यासारखी खळखळती आणि प्रवाही असली पाहिजे. भाषा आणि त्यादवारे होणारे संवाद हीच यशाची खरी गुरुकिल्ली असते, असे प्रतिपादन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘भाषा: संवादकौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’च्या समारोप व पारितोषिक वितरण प्रसंगी डॉ. मलघे बोलत होते.

यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, ज्ञानविकास प्रबोधिनीचे अध्यक्ष विवेक गुरव, अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप कांबळे, सत्यम सानप आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील विविध कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने मराठी विभागाने 2018-19 मध्ये ‘भाषा: संवादकौशल्य प्रमाणपत्र अभ्याक्रमा’चे दि. 22 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये आयोजन केले होते. सदर अभ्यासक्रमासाठी बीए., बी.कॉम., बी.सी.ए., एम.ए. या वर्गातील 45 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या अभ्यासक्रमासाठी वडगाव मावळ येथील ‘ज्ञानविकास प्रबोधिनी’ या संस्थेचे विवेक गुरव यांनी मार्गदर्शन केले. गुरव यांनी भाषा, भाषेचे विविध क्षेत्रातील उपयोग व कार्य, भाषेचे महत्त्व आणि त्यातून विकसित होणारा व्यक्तिमत्व विकास, संवाद, विसंवाद, संभाषण ते भाषण अशा विविध घटकांचे यथार्थपणे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना बोलते केले.

तर डॉ. विजयकुमार खंदारे यांनी माणसाने एकदा भाषिक कौशल्य आत्मसात केली की त्याची कोणीच चोरी करू शकत नाही आणि ती चोरताही येत नाहीत. ही कौशल्ये प्रयत्नानाने सर्वाना साध्य करता येणारी आहेत असे सांगून या अभ्यासक्रमामागील भूमिका विषद करताना मराठी विभागाची परंपरा आणि भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील उपक्रमांचा आढावा सादर केला.

दि. 30 जानेवारी रोजी गुरव यांनी सदर विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा एक विषय देऊन त्यासाठी 5 मिनिटांचा वेळ देऊन बोलण्यास सांगितले. त्यातून विद्यार्थ्यांचे हावभाव, सादरीकरण, सभाधीटपणा, संवादकौशल्य यातील चुका आणि जमेच्या बाजू काय ? यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी सोळा विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी मनोगत व्यक्त करणा-या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. कार्यक्रम संपल्यावर ते त्यांना दाखवून आपले आत्मपरीक्षण करण्यास सांगितले. त्यातून चार क्रमांक काढण्यात आले. यावेळी पारितोषिक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पारितोषिक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साधना साप्ताहिकाचा दिवाळी अंक, गुलाब पुष्प आणि प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी 45 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन व आभार डॉ. संदीप कांबळे यांनी मानले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

1. प्रथम क्रमांक : हर्षदा कांबळे (एस.वाय.बी.एस्सी)
2. द्वितीय क्रमांक : स्वाती सोनावळे (एम.ए. प्रथम वर्ष)
3. तृतीय क्रमांक : विनायक दवणे (एम.ए. द्वितीय वर्ष)
4. उत्तेजनार्थ क्रमांक : ज्योती पोटफोडे (एस.वाय.बी.एस्सी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.