Talegaon Dabhade News : मालमत्ता कर भरण्यासाठी नगर परिषदेच्या वसुली विभागात नागरिकांची गर्दी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मालमत्ता करांची बिले मालमत्ता धारकांना पाठविताच करभरणा करण्यासाठी नगर परिषदेच्या वसुली विभागात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी बिले मिळताच आपली वसुली भरून टाकावी, असे आवाहन मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मालमत्ता कराची थकबाकी प्रचंड थकलेली आहे. यावर्षी तळेगावातील 35 हजार मालमत्ता धारकांकडून सुमारे 29 कोटी 38 लाख 63 हजार रुपयांची मागील व चालू वर्षाची वसुली करावयाची आहे. त्यापैकी आत्तापर्यंत अवघी 16 टक्के वसुली झालेली आहे. त्यामुळे एकूण 24 कोटी 87 लाख 61 हजार इतकी वसुली आगामी तीन महिन्यात प्रशासनाला करावयाची आहे.

मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, कर संकलन अधिकारी विजय शहाणे यांनी वसुली बाबत नियोजन केलेले असून जास्तीत जास्त वसूल करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार आहे. सध्या कर संकलन विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे.

नगर परिषदेने वसुलीसाठी शहराचे एकूण 12 विभाग केले आहेत. त्यासाठी आदेश गरुड, प्रवीण माने, तुकाराम मोरमारे, संभाजी भेगडे, आशिष दर्शले, प्रवीण शिंदे, प्रशांत गायकवाड, विलास वाघमारे, विशाल लोणारी, अरविंद पुंड या अधिकाऱ्यांकडे भागाप्रमाणे वसुलीच्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. तर पाणी पुरवठा विभागाचे पाणीपट्टी वसुलीचे नियोजन विभाग प्रमुख स्मिता गडे यांनी केले आहे. याशिवाय नगर परिषदे मध्ये मालमत्ताकर व पाणीपट्टी भरण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे.

मालमत्ताकर भरण्यासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भरणा करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत असल्याने अधिकच्या स्वतंत्र कक्षाची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.