Talegaon Dabhade : कांतीलाल शाह शाळेने जपले समाजसेवेचे व्रत

आश्रमशाळेतील मुलांना देणार शैक्षणिक साहित्य; अध्यक्ष शैलेशभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी दिली शाळेस भेट

एमपीसी न्यूज – कांतीलाल शाह विद्यालयात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये विद्यालयाचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन पाहणी केली. आणि तेथील परिस्थिती जाणून घेतली. यातील आश्रमशाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य देणार असल्याची माहिती मान्यवरांनी शनिवारी (दि 20) पत्रकार परिषदेत दिली.

या शाळांमधील विद्यार्थी गरीब, आदिवासी, कातकरी कुटुंबातील आहेत असे निदर्शनास आले आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मुलभुत गरजाही त्यांना मिळत नाही. म्हणूनच या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जुने कपडे, पुस्तके, चित्रकलेचे साहित्य, सायकल अशा गोष्टी एकत्रित करून स्वतः मुलांनी आपले खाऊचे पैसे वाचवून या कार्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पैशातून सुमारे शंभर लोखंडी पेटयांची व्यवस्था आश्रमशाळेतील मुलांना खासगी वस्तू ठेवण्यासाठी केली आहे. आणखी काही पेट्यांसाठी लायन्स क्लब मदत करणार असून उर्वरित पेट्यांकरिता तळेगाव आणि मावळातील दानशूरांना मदतीचे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि कांतीलाल शाह शाळेचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांनी शनिवारी (दि 20) पत्रकार परिषदेत केले.

  • संस्थेच्या वतीने मावळातील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची अद्ययावत शाळा सुरू करण्याचा मानसही शाह यांनी व्यक्त केला. पर्यावरणांशी निगडित यावर्षी एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सर्व शिक्षक वृंदांनी केला आहे.

याप्रसंगी संगीत तज्ज्ञ, किर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक ‘अंबर’चे संपादक सुरेश साखवळकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्ताने सत्कार करण्यात आला. शालेय व्यवस्थापनाचे महेशभाई शहा, संजय साने, मुख्याध्यापिका सुमन रावत, प्रकल्प प्रभारी अर्चना मुरूगकर,सारीका तितर, संजली गरूड, अर्चना चव्हाण व शिक्षक वर्ग उपस्थितहोते.

  • कांतीलाल शाह विद्यालय आणि लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने मावळातील दुर्गम भागातील माळेगाव येथील सेवाधाम आश्रमशाळेच्या चारशे आदिवासी विद्यार्थ्यांना येत्या 28 जुलै रोजी पेट्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, शाळेचे संचालक व सदस्य तसेच लायन्स क्लब ऑफ तळेगावचे सदस्य सेवाधाम आश्रम शाळेला भेट देऊन या दिवशी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सुमन रावत यांनी केले. शाळेत साज-या झालेल्या गुरूपौर्णिमा, वृक्षारोपण व इतर सामाजिक उपक्रमाची माहिती शिक्षिका अर्चना मुरूगकर यांनी दिली. प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांनी केले तर, आभार शाळेचे उपाध्यक्ष महेशभाई शहा यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.