Talegaon Dabhade : मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या बदलीमुळे तळेगाव नगरपरिषदेतील कामकाज विस्कळीत

एमपीसी न्यूज- तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची बदली झाल्यामुळे नगरपरिषदेतील प्रशासकीय कामकाजाला मंदगती प्राप्त झाली असून विस्कळीतपणा आलेला आहे.यामुळे नागरिकांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची बदली अकोले महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर झाली आहे. त्यांनी आपला नगरपरिषदेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार दि. २५ जुलै रोजी लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांचेकडे सुपूर्द केला. पवार यांचेकडे लोणावळा नगरपालिकेसह प्रभारी म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा पदभार सध्या आहे.

पवार यांचेकडे दोन्ही नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार आहे. सध्या मावळात विशेष करून लोणावळा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवार यांना लोणावळा येथे आपत्कालीन कामासाठी जास्त वेळ द्यावा लागत आहे. त्यातून काही दिवस ते तळेगावसाठी देत आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये प्रभारी मुख्याधिकारी असल्याने व त्यांचे येणे मर्यादित असल्याने प्रशासकीय कामकाजाचे ठोस निर्णय घेणे कठीण जात आहे.

तळेगावचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद होता. त्यामुळे नागरिकांचे फार हाल झाले. तसेच येणा-या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीची जबाबदारी नगराध्यक्षाच्यावर सोपविली असली तरी प्रशासकीय पूर्ततेसाठी मुख्याधिकारी आवश्यक आहे. असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. तसेच नागरिकांची महत्वाची व विविध कामे करण्यासाठी नागरिकांना नगर परिषदेमध्ये सारखे हेलपाटे मारावे लागतात. या सारख्या अनेक कारणामुळे कायम स्वरूपी मुख्याधिकारी कधी येणार याची वाट पाहत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.