Talegaon Dabhade : जागतिक चिमणी दिवस इंद्रायणी महाविद्यालयात उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत तळेगाव नगर परिषदेच्या वतीने ‘घर तिथे घरटे’ उपक्रम जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने इंद्रायणी महाविद्यालयात राबविण्यात (Talegaon Dabhade )आला. चिमण्यांची घरटी बनविणे या उपक्रमात 45 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन सुंदर अशी घरटी बनविली. याप्रसंगी प्रा. आर. आर. डोके यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घरटी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच चिमण्यांच्या अधिवासाबद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली.

 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, पूर्वी चिमण्यांची घरटी साधी असलेली कौलारू घरे, घरांमधील फोटोंच्या मागे असायची. पहाटेचा चिव चिवाट  कानाला आनंद देणारा असायचा. एक वेगळीच मजा असायची. आता ती मजा तो आनंद हरवत चालला आहे असे वाटते. चिमण्यांचा अधिवास मानवी वस्तीजवळ, विहिरीजवळ, बोरांची झाडे, बाभळीची झाडे ही त्यांची आवडती जागा.सकाळी घरातील आई, आजी ज्वारी, बाजरी, चपात्यांचे तुकडे टाकायची. सर्व चिमण्या त्यावर ताव मारायच्या जस जसा माणूस विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला तसतसे चित्र बदलू लागले.

गेल्या पंधरा ते वीस वर्षात 85 टक्के एवढी चिमण्यांच्या संख्येत घट झालेली दिसते. आज शहरांमधील वातावरणाचा समतोल राखण्यासाठी हवा,पाणी, प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक उपक्रम राबविला जात आहे.चिमणी तिचे घरटे स्वतः खूप आकर्षक बनवते पावसाळा सुरू होण्यापूर्वी दोन ते तीन महिने अगोदर चिमणी आपले घरटे बनवण्यास सुरुवात करते. हिरव्या लहान गवतापासून ते घरटे बनवलेले असते. चिमणीच्या खोप्यावर बहिणाबाई चौधरी यांनी सुंदर काव्यरचले “अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलांसाठी जीव तिने झोका झाडाले टांगला. पिले निजली खोप्यात,जसा झु लता बंगला, तिचा पिल्लांसाठी जीव तिने झोका झाडाले टांगला.”

खरोखरच हे वास्तव आहे. आज चिमण्या नामशेष होताना दिसत आहेत. यामागे मातीची कमी होत चाललेली  घरे. जंगले कमी होत चाललेली आहेत. शेती कमी होत चाललेली आहे. शेतातील पिकांवरील फवारणी, रासायनिक खतांचा वापर, स्वच्छ पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. चिमण्यांना लोळण घेण्यासाठी कमी होत चाललेला मातीचा फुफाटा, ध्वनी प्रदूषण, मोबाईल टावर मधून येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींचे उत्सर्जन, फटाक्यांचा वापर यामुळे चिमणी नामशेष होताना दिसत आहे. चायनीज मांजाचा वाढता वापर. जागा नसल्यामुळे अनेक चिमण्यांची घरटी इलेक्ट्रॉनिक स्विच बॉक्समध्ये पाहायला मिळतात. बिहार राज्याने चिमणीला राज्यपक्षी म्हणून मान्यता दिली आहे.

 

MPC News Podcast 21 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

चीनमधील 1958 ते 62 सालचे उदाहरण पाहिले तर चीनचे अध्यक्ष माओ झेडांग यांच्याकडे सत्ता होती. एक तज्ञ त्यांना बरळले की आपल्या देशामध्ये चिमण्यांची संख्या मोठी आहे. एक चिमणी दिवसाला तीन ते चार किलो धान्य खाते. चिमणी मारो आंदोलन केले. चार वर्षांमध्ये चीन मधील सर्व चिमण्या मारण्यात आल्या.

पुढे जेव्हा टोळधाड नावाची कीड चीनमध्ये आली तेव्हा त्या किड्यांनी तेथील सगळं धान्य तेथील असलेला भाजीपाला सगळा फस्त करून टाकला. कारण एक किलोमीटरच्या अंतरात टोळधाड किड्यांची संख्या आठ कोटी पेक्षाही जास्त होती. त्यानंतर चीनची अवस्था खूप बिकट झाली. पुढील काळात चीनला अन्नधान्याचा खूप तुटवडा जाणवला. अन्नधान्य वाचून चीनमध्ये साडेचार कोटी लोक हे मृत्युमुखी पडले. अन्न मिळाले नाही म्हणून चिखलाचा गोळा करून त्यावर मीठ टाकून ती खाण्याची एक वेळ त्यांच्यावर आली. त्यातही त्यांचा अंत झाला आणि नंतर चीनला जेव्हा हे समजलं की आपल्याला चिमण्यांचे संवर्धन केले पाहिजे. म्हणून चीनने सोवियत युनियन मधून चिमण्यांची अंडी आणि चिमण्या मागवल्या. चिमण्यांचे संवर्धन केले.

म्हणून आपण खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे संवर्धन करूया. आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया की पर्यावरणाचा समतोल राखू व झाडे लावूया. असे विचार प्रा. आर. आर. डोके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मलघे सर यांनी आपण आपल्या घरी हे तुम्ही बनविलेले चिमण्यांचे घरटे लावून सर्वांनी चिमण्यांचे संवर्धन करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

 

कार्यक्रमप्रसंगी उपप्राचार्य प्रा.ए.आर.जाधव, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. एन.टी भोसले, प्रा. एस. पी. भोसले, प्रा. डी. एम. भापकर, प्रा. के.डी.जाधव, प्रा.अहिरे मॅडम, प्रा पुंडलिक मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने (Talegaon Dabhade ) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन. टी. भोसले यांनी केले व आभार अहिरे मॅडम यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.