Talegaon News: संतापजनक! पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने हातोड्याने केलेल्या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाने हातोड्याने केलेल्या हल्ल्यात एक 17 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. हातोडीचा घाव डोक्यात बसल्याने रक्तबंबाळ झालेल्या मुलीला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे येथे बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर रुपी बँकेजवळ आज (गुरूवारी) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.

शिवम शेळके (वय 20, रा. तळेगाव स्टेशन) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी तरुण त्रास देत असल्याची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला दिली होती. तो राग डोक्यात ठेवून आरोपीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

पीडित मुलगी बाजारपेठेतून दुचाकीवरून जात असताना आरोपीने तिच्यावर पाठीमागून हल्ला केला. डोक्यात हातोडीचा घाव बसल्याने मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमीवर उपचार सुरू असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.