Talegaon News : मतदार याद्यांबाबत जागृत रहावे – किशोर आवारे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषद हद्दीतील वार्डनिहाय मतदार याद्यांबाबत कार्यकर्त्यांनी जागरुक रहावे, असे आवाहन जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक वार्डनिहाय कार्यकर्त्यांनी मतदार यादीचा सखोल अभ्यास करून वार्ड मधील रहिवाशी ज्यांची नावे अजून मतदार यादीत समाविष्ट नाहीत त्यांची नावे मतदार यादीत नोंदवण्याचे काम सुरू करावे तसेच प्रत्येक वॉर्डमध्ये काही प्रमाणात वॉर्डमधील रहिवासी नसताना देखील नावे घुसवण्यात आल्याने सदर बोगस नावे मतदार यादीतून वागळण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशा सूचना आवारे यांनी दिल्या आहेत.

निवडणूक आयोगाने मतदार यादी निश्चित करताना जनगणना करणे अपेक्षित आहे, जनगणना केल्याने बोगस मतदारांना थारा मिळणार नाही त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यास मदत होईल असे मतही किशोर आवारे यांनी व्यक्त केले.

स्थलांतरित, विवाहित कन्या, तसेच मृत मतदारांची नावे कमी करण्यात यावीत, मताधिक्य वाढावे यासाठी काही मंडळी इतरत्र राहणारे मतदार आपल्या वॉर्डमध्ये घुसवून मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होते अशा गोष्टींना आळा बसावा, यासाठी वार्डमध्ये रहात नसणाऱ्या मतदारांचे नाव कमी करण्यात यावे तसेच असे किती मतदार आहेत याची यादी वॉर्ड निहाय तयार करून वाॅर्ड प्रमुखांनी निवडणुक आयोगाकडे वेळीच तक्रार दाखल करावी अशा सूचना आवारे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.