Talegaon News : ऑनलाईन निवेदन स्पर्धेत डॉ. विनया केसकर यांना विजेतेपद

एमपीसी न्यूज – अरुण दाते कला अकादमी आयोजित आणि अतुल अरुण दाते प्रस्तुत, “बोलू ऐसे बोल, ये हृदयीचे ते हृदयी” या मराठी निवेदनाच्या ऑनलाईन स्पर्धेत डॉ. विनया केसकर यांना विजेते निवेदक म्हणून पारितोषिक देण्यात आले.

त्यांच्या सोबत अनुक्रमे कल्पेश कुलकर्णी (नाशिक), जान्हवी खराळकर (नवी मुंबई) यांना देखील अंतिम फेरीत विजेते म्हणून घोषित केले आहे. ही स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. पहिल्या फेरीत कोणत्याही गाण्याची जन्मकथा असा विषय होता. दुसऱ्या फेरीत गाण्यातील कवितेचा भावार्थ आपल्या शब्दांत मांडायचा होता. तिसऱ्या फेरीत तीन वेगवेगळ्या गाण्यांचे निवेदन दिलेल्या प्रसंगाला अनुरूप असे करायचे होते.

पहिल्या फेरीत 223 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून दुसऱ्या फेरीत 37 जणांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत 17 स्पर्धक निवडले गेले . सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री लेले यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले होते.

धनश्री लेले यांनी सांगितले की , “स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद हा संख्यात्मक नव्हता तर गुणात्मक होता. सर्व स्पर्धकांचे व्हिडीओ पुन्हा पुन्हा पहिले. कारण दिलेल्या प्रसंगाला अनुरूप निवेदन करायचे होते. यामध्ये कार्यक्रमाची वेळ, ठिकाण, कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यायचे या अशा अनेक मुद्द्यांचा विचार करुन अंतिम विजेते निवडले आहेत. निवेदन या कलेसाठी अशा स्पर्धेचे आयोजन करावे अशी कल्पना अत्यंत अभिनव होती.”

अतुल दाते म्हणाले, “ जागतिक स्तरावर पहिली निवेदनाची स्पर्धा हा अनुभव अत्यंत चांगला होता. प्रतिसाद देखील उत्तम मिळाला. तीन फेऱ्यांमध्ये तावून सुलाखून तीन विजेते निवडले आहेत. अरुण दाते कला अकादमीच्या दर्जेदार कार्यक्रमात या विजेत्यांना संधी देणार आहे. गायन, गीत लेखन अशा स्पर्धा देखील अकादमीच्या वतीने घेण्यात आल्या आहेत. तसेच येत्या काळात देखील नवीन संगीतकार आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ”

ऋचा थत्ते यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.