Talegaon : किशोर आवारे हत्या प्रकरणानंतर पोलीस हाय अलर्टवर

एमपीसी न्यूज – किशोर आवारे यांची निर्घृणपणे (Talegaon) भर दिवसा हत्या करण्यात आली. त्यानंतर जवळपास संपूर्ण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासचक्रे फिरवली आहेत. मात्र याला राजकीय किनार असल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस हाय अलर्टवर आहेत.

किशोर आवारे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला सोमाटणे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वाढती गर्दी लक्षात घेता तिथे राखीव पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली. हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथेही पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, किशोर आवारे यांचे घर, खांडगे पेट्रोल पंप यासह चौकाचौकात भलामोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, श्रीकांत डिसले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Wakad : वाकड येथील पंचतारांकीत हॉटेलमधून वेश्या व्यवसाय प्रकरणी एकाला अटक

रात्री पावणे अकरा वाजता पोलीस बंदोबस्तात किशोर आवारे यांचा मृतदेह वायसीएम मधून तळेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले. त्यानंतर किशोर आवारे यांच्या घरून तळेगाव स्टेशन चौक मार्गे बनेश्वर स्मशानभूमी अशी पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा निघाली. यावेळी देखील जागोजागी पोलीस आणि फक्त पोलिसच दिसत होते. रात्री पावणे बारा वाजता बनेश्वर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हा संपूर्ण घटनाक्रम सुरु असताना स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बसून यातील प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेऊन होते. सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे हे त्यांच्या नियोजित सुट्टीवर गेले होते. घटनेची माहिती मिळताच ते सुट्टी रद्द करून तळेगाव दाभाडे येथे पोहोचले.

या प्रकरणाला राजकीय किनार असल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याने याचे चुकीचे पडसाद उमटू नये. परिसरात शांतता राहावी, यासाठी पोलीस हाय अलर्टवर झाले आहेत. रात्रभर शेकडो पोलिसांनी तळेगाव गावठाण आणि शहरात खडा पहारा दिला (Talegaon)आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.