Talewade : प्रस्तावित रस्त्यांना गती, जागा ताब्यात घेण्याकरिता शिबिर

एमपीसी न्यूज – चिखली व तळवडेसह परिसरात वाहतूक कोंडी (Talewade)सोडवण्याच्या तब्बल 7 नवीन रस्त्यांच्या कामाला प्रशासनाने गती दिली आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

समाविष्ट गावांतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी (Talewade)भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सदर काम प्रलंबित होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आमदार लांडगे यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार, प्रशासनाने चिखली आणि तळवडेतील नवीन सात रस्त्यांना मंजुरी दिली.

Pimpri : ‘महापालिका निवडणुका कायमच्याच रद्द केल्याचे जाहीर करा’

त्यानंतर आता येत्या दि. 26 आणि दि. 27 ऑक्टोबर रोजी चिखली-तळवडे गावठाण येथील महापालिका शाळेत या शिबिराचे आयोजन केले आहे.

चिखली, तळवडे परिसरात अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नोकरदार, परिसरातील नागरिक सातत्याने होणाऱ्या या वाहतूक कोंडी विरोधात संताप व्यक्त करत आहेत. याबाबत.नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार, आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाकडे पर्यायी नवीन रस्त्यांची मागणी करण्यात आली.

प्रशासनाने त्याबाबत सल्लागार नियुक्ती केली आणि त्यानंतर जागेची मार्किंग आणि आयडेंटिफिकेशन करण्यात आले. त्याला महापालिकेच्या संबंधित कमिटींची मान्यता मिळाली. आता जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

मौजे चिखली व तळवडे येथील मंजुर विकास योजनेतील 7 रस्त्यांसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रस्ता बाधित नागरिकांची यादी तयार केली आहे. त्यानुसार संबंधित जमीन मालकांना ‘अ’ व ‘ब’ प्रपत्राचे वाटप, वाटाघाटी याबाबत शिबिरात मार्गदर्शन करण्यात येईल. जागा ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.

…या रस्त्यांसाठी होणार भूसंपादन!
1) चिखली येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठकडे जाणारा 12 ते 18 मीटर रुंद डीपी रस्ता (रस्त्याची लांबी 1370 मीटर).

2) चिखली येथील साने चौक ते चिखली गाव 12 ते 24 मीटर आणि 30 मीटर रुंद रस्ता (रस्त्याची लांबी 2030मीटर).

3) चिखली येथील देहू आळंदी ते सोनावणे वस्तीकडे जाणारा 30 मीटर रुंद डीपी रस्ता (रस्त्याची लांबी 2250 मीटर).

4) चिखली येथील चिखली चौक ते सोनावणे वस्तीकडे जाणारा 24 मीटर रुंद रस्ता (रस्त्याची लांबी 2 हजार मीटर).

5) तळवडे येथील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौकापर्यंत 24 मीटर रुंद उर्वरित रस्ता (रस्त्याची लांबी 400 मीटर).

6) तळवडे येथील तळवडे कॅनवे चौक ते निगडी स्पाईन रस्त्याला जोडणारा 18 मीटर डी.पी. रस्ता (रस्त्याची लांबी 1950 मीटर).

7) तळवडे येथील नदीच्या कडेने जाणारा 12 मीटर रस्ता व चिखली तळवडे शीवेवरील 24 मीटर रस्ता (रस्त्याची लांबी 2100 मीटर). असे रस्ते प्रस्तावित आहेत.

समाविष्ट गावांतील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. चाकण औद्योगिकपट्टा, तळवडे आयटी पार्क या भागातून देहूरोड आणि अन्य भागात होणारी वाहतूक सक्षम करण्यासाठी तळवडे आणि चिखली गावाबाहेरून नवीन रस्ते प्रस्तावित केले आहेत. सुमारे 12 किलोमीटर नवीन पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांना भेडसावणारा वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

 

प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया गतीमान करावी आणि लवकरच रस्त्यांच्या कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा आहे, असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.