TATA IPL 2022: अखेर हैदराबादचा सन झाला राइज, चेन्नई संघाला 8 गडी राखून चारली धूळ

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) – क्रिकेट खेळ जितका अगणित अनिश्चिततेने भरलेला आहे, तेवढाच तो मजेदार आहे म्हणा वा निष्ठूर आहे म्हणा, बघा ना ज्या चेन्नईने चार वेळा व मुंबईने पाच वेळा या स्पर्धेला जिंकून या स्पर्धेवर आपले अधिराज्य गाजवले, त्या दोन्हीही संघांना या वर्षीच्या हंगामात अजूनही विजयाचे खाते सुद्धा उघडता आलेले नाही. बलाढ्य चेन्नई संघाचा आज सलग चौथा मानहानीकारक पराभव करत हैदराबाद संघाच्या विजयाचा आज अखेर उदय झालाच. नवोदित अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी हैदराबादच्या विजयाचे खरे शिलेदार ठरले.

शनिवारच्या ‘डबल धमाका’मध्ये आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद दोन संघात आज मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झाला. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने रवींद्र जडेजा विरुध्द नानेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो त्याच्या सर्वच गोलंदाजांनी सार्थ ठरवत बलाढ्य चेन्नई संघाला केवळ 154 धावातच रोखले.

चेन्नई संघाच्या डावाची सुरुवात ऋतुराज आणि रॉबिनने केली खरी, पण ऋतू सलग चौथ्या डावातही फुललाही नाही आणि तो राजही करू शकला नाही. त्याला नटराजनने 16 धावांवर त्रिफळाबाद करून चेन्नई संघाला पहिला धक्का दिला. यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच रॉबिन सुद्धा फक्त 15 धावा काढून सुंदरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यावेळी चेन्नई संघाची अवस्था दोन बाद 35 अशी होती.

या कठीण प्रसंगी आक्रमक खेळत मोईन अलीने बऱ्यापैकी हल्लाबोल करत हैदराबाद संघाच्या गोलंदाजांना हताश करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याला अंबाती रायडूनेही बऱ्यापैकी साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 62 धावांची भागीदारी करून डाव बऱ्यापैकी सावरला आहे, असे वाटत असतानाच अंबाती रायडू वैयक्तिक 27 धावा करून सुंदरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि अगदी काही क्षणातच मोईन सुद्धा आक्रमक 48 धावा काढून मार्कमची शिकार झाला.

यावेळी चेन्नई संघाची धावसंख्या 15 व्या षटकात 5 बाद 98 अशी होती, त्यानंतर धोनी, शिवम दुबे हे सुध्दा स्वस्तात बाद झाले आणि चेन्नई संघ पुरता अडचणीत आला. अशा वेळी जडेजाने आक्रमक होत 15 चेंडूत 23 धावा करून संघाला कसेबसे दीडशेचा पल्ला गाठून दिला.

हैदराबाद संघाकडून नटराजन आणि सुंदरने चांगली गोलंदाजी करत प्रत्येकी दोन बळी मिळवले. त्यांना भुवनेश्वर, जानसेन आणि मार्करमने एकेक बळी मिळवून चांगलीच साथ दिली.

आपल्या पहिल्यावहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हैदराबाद संघाला विजयासाठी 120 चेंडूत 155 धावा हव्या होत्या. त्यासाठी त्यांनी अगदी हवी तशी सुरुवात केली आणि संघाला एक स्वप्नवत सुरुवातही करून दिली.

नवोदित युवा डावखुरा अभिषेक शर्माने कर्णधार केन विल्यमसनला अतिशय चांगली साथ देताना केन पेक्षाही सुंदर खेळ करत संघाला पहिल्या गड्यासाठी 73  चेंडूत 89 धावांची मोठी भागीदारी करून देत विजयाचा पायाही रोवला. नेमक्या याचवेळी केन विल्यमसन मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर 32 धावा काढून झेलबाद झाल्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने पहिल्याच चेंडूपासून आक्रमक खेळत विजयाकडे संघ कसा लवकर पोहचेल हेच बघितले.

दरम्यान आयपीएल मधले आपले पहिले अर्धशतक पूर्ण करून मोठ्या खेळीकडे जात असलेल्या अभिषेक शर्माची 75 धावांची सुंदर खेळी ब्रावोने संपवली पण तोवर त्याने हैदराबाद संघाच्या विजयाची फक्त औपचारिकताच ठेवली होती. ती त्रिपाठी आणि निकोलस पूरनने आठ गडी आणि 14 चेंडू राखून पुरी केली आणि हैदराबाद संघाचा पहिला विजय थाटात साजरा केला.

त्रिपाठी 15 चेंडूत 39धावा काढून नाबाद राहिला. चेन्नई संघासाठी हा सलग चौथा पराभव ठरला तर हैदराबादसाठी पहिलाच विजय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.