Tata IPL 2022: राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या आजच्या डबल धमाकातल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाचा 23 धावांनी पराभव करत आपला दुसरा विजय तर प्राप्त केलाच, पण ही स्पर्धा सर्वधिक पाच वेळा जिंकणाऱ्या मुंबई संघाची गुणांची पाटी अजूनही कोरीच ठेवण्यात मोठी कामगिरीही निभावली.

आज मुंबईचा कर्णधार रोहीतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, सूर्यकुमार यादवला आज अंतिम अकरात नक्की खेळवले जाईल अशी शक्यता सामना सुरु होण्यापूर्वी वर्तवली गेली होती, पण ती अखेर शक्यताच राहिली.

राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली, युवा जैस्वाल आज काही यशस्वी ठरला नाही, तो सामन्याच्या तिसऱ्या षटकात बुमराहची कोवळी शिकार ठरला,त्याने फक्त एक धाव काढली, त्यानंतर जोस बटलर आणि  देवदत्त पडीकलने पुढे खेळताना केवळ दुसऱ्या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी केली.

देवदत्त पडीकल आजही विशेष काही करू शकला नाही आणि वैयक्तिक सात धावा करून मिल्सच्या गोलंदाजीवर बाद झाला,यावेळी राजस्थान संघाची धावसंख्या दोन बाद 48 होती, त्यानंतर मात्र कर्णधार संजू सॅमसन आणि बटलर या जोडीने जोरदार खेळ करत संघाला सावरले.

खास करून बटलर एकदम भरात होता,त्याने चौफेर फटकेबाजी करत मोठया धावसंख्येकडे कूच सुरू केली. या जोडी 82 धावांची भागीदारी केली असतांना पोलार्डने संजूला बाद करून ही भागीदारी फोडली.

संजूने 21 चेंडूत 3 षटकार मारत 30 धावा केल्या.त्यानंतर आलेल्या सिमरन हेटमायरने हाच धडाका चालू ठेवताना आपल्याच देशबांधव कायरन पोलार्डवर सामन्याच्या सतराव्या षटकात हल्लाबोल करत तब्बल 25 धावा चोपल्या, दुसऱ्या बाजूने जोस बटलरने आपल्या चांगल्या खेळीचे रूपांतर शतकात करून आपले टी-20मधले तिसरे तर आयपीएल मधले दुसरे शतक पूर्ण केले.

तुफानी हल्ला करणाऱ्या हेटमायरची स्फोटक खेळी बुमराहने संपवली, हेटमायरने फक्त 14 च चेंडूत तीन चौकार आणि तेवढेच षटकार मारत 35 धावा चोपल्या, मात्र तो बाद झाल्यानंतर आलेल्या फलंदाजांने धावा वाढवण्यासाठी केवळ आक्रमण केले ज्यामुळे राजस्थान संघाची अवस्था चार बाद 184 वरुन 7 बाद 188 झाली, पण तरीही या आक्रमक खेळामुळे राजस्थान रॉयल संघाने आपल्या निर्धारित 20 षटकात 193 धावा धावफलकावर लावण्यात यश मिळवले.

राजस्थान संघाकडून बटलरने 100 धावा करत या हंगामातला पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावला.मुंबई इंडियन्स कडून बुमराहने सर्वांत जास्त किफायतशीर गोलंदाजी करताना आपल्या चार षटकात 17 धावा देत तीन बळी मिळवले तर मिल्सने तेवढेच तीन बळी मिळवताना 35 धावा खर्च केल्या, पोलार्ड आज महागडा ठरला,त्याने एक बळी मिळवण्यासाठी तब्बल 46 धावा खर्च केल्या.

194 धावांचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवत आणि आपला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अपेक्षित चांगली झालीच नाही. ईशान किशन आणि रोहीतने डावाची सुरुवात केली खरी पण कर्णधार रोहित आजही आपल्या किर्तीला साजेसा खेळू शकला नाही, आणि तो फक्त 10 दहा करून प्रसिदध कृष्णाला आपली विकेट देऊन तंबुत परतला.

त्यानंतर आलेल्या अनमोलप्रित सिंगलाही मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही, तो ही फक्त चार धावा करून सैनीच्या गोलंदाजीवर बाद झाला,यावेळी मुंबई संघ दोन बाद 40 अशा कठीण अवस्थेत होता, मात्र त्यांनी विजयाची आस सोडली नव्हती, युवा ईशान किशन या मोसमाच्या सुरुवातीपासूनच  भरात दिसत आहे. आजही तो त्याच लयीत दिसत होता, त्याला दुसऱ्या बाजूने साथ द्यायला आला तो आणखी एक युवा प्रतिभावंत आणि डावखुरा फलंदाज तिलक वर्मा. या तशा अनुनभवी जोडीने  जबरदस्त फलंदाजीचे प्रात्यक्षिक दाखवत सर्व दडपण झुगारून देत डाव सावरला.

दोघेही फलंदाज उत्कृष्ट खेळत होते. बघताबघता याची भागीदारी 80 धावांची झालेली असताना या चांगल्या खेळीला नजर लागली असे वाटावा असा फटका ईशान किशनने मारला आणि त्याचे रूपांतर तितक्याच सुंदर झेलात नवदीप सैनीने करून ईशान किशनची सुंदर खेळी समाप्त केली, ईशानने आपले दहावे अर्धशतक पूर्ण करताना 43 चेंडूत 54 धावा करताना 5 चौकार आणि एक षटकात मारला.

दुसऱ्या बाजूने युवा तिलक सुद्धा अप्रतिम खेळत झुंजार फलंदाजी करत होता. आज त्याने आपल्या दुसऱ्याच सामन्यात खेळताना पहिले अर्धशतक केवळ 28 धावात पूर्ण केले. त्याचा हाच धडाका अर्धशतकानंतरही चालूच होता, त्याने अनुभवी अश्विनला एक रिव्हर्स स्वीप वरून उत्तुंग षटकार मारत आपल्या प्रतिभेचा सुंदर आविष्कार ही दाखवला, मात्र या फटक्याने डीवचला गेलेल्या अश्विनने पुढच्याच चेंडूवर त्याला साफ चकवले आणि त्याच्या यष्ट्या गुल केल्या. अशा रितीने एक सुंदर आणि अविस्मरणीय खेळी संपुष्टात आली, पण तिलक वर्माने पाच षटकार आणि तीन चौकार मारत 33 चेंडूत 61 धावा केल्या.

या पडझडीमुळे मुंबई इंडियन्सची अवस्था दोन बाद 120 वरुन चार बाद 133 अशी झाली, याच अडचणीत भर पाडत यजुवेंद्र चहलने आपला कमाल दाखवत दोन ताबडतोब विकेट्स मिळवून मुंबईला आणखीनच गोत्यात आणले.यावेळी मुंबई संघाची अवस्था 15.2 षटकात सहा बाद 136 अशी झाली होती, आणि मैदानावर फक्त पोलार्ड हे एकमेव आशास्थान आणि त्याच्या सोबतीलातळाचे फलंदाज होते.

उरलेल्या 28 चेंडूत 54 धावा हव्या होत्या.पोलार्डचे नाव आणि खेळ नक्कीच अप्रतिम असला तरी राजस्थानचे गोलंदाज आज आपल्या संघासाठी रॉयल गोलंदाजी करत होते. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या हातातून सामना बघताबघता निसटून चालला होता.

शेवटच्या षटकात मुंबई इंडियन्सला 29  अशक्यप्राय धावा हव्या होत्या आणि त्या रोखण्यासाठी सज्ज होता तो नवदीप सैनी. त्याने महाकाय पोलार्डची डाळ जराही शिजू दिली नाही आणि त्याला निस्तेज करत फक्त पाचच धावा देत वर त्याची विकेट घेत आपल्या संघाला 23 धावांनी विजयी करत आपल्या नावावर चार गुणांची नोंद करत अंकतालिकेत संयुक्त प्रथम क्रमांक ही मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स
20 षटकात 8 बाद 193
बटलर 100,संजू सॅमसन 30,हेटमायर 35
बुमराह 17/3,मिल्स 35/3

विरुद्ध
मुंबई इंडियन्स
रोहीत 10,अनमोलप्रीत 4 तिलक वर्मा 61,ईशान किशन 54,पोलार्ड 22
चहल 26/2,बोल्ट 29/1,कृष्णा 36/1,अश्विन 30/1 सैनी 30/2

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.