Manobodh by Priya Shende Part 1: मनोबोध भाग 1 – गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा…

एमपीसी न्यूज – गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एमपीसी न्यूजच्या वतीने समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक आणि त्यांचा भावार्थ यावर आधारित समर्थसाहित्याच्या अभ्यासिका प्रिया शेंडे यांची मनोबोध ही मालिका सुरू करीत आहोत. रविवार सोडून आठवड्यातील सहा दिवस या मालिकेचे भाग प्रसिद्ध केले जाणार आहेत.
——————————————

प्रिया शेंडे ह्या पुण्यातील रहिवासी असून त्या MBA finance झालेल्या आहेत. गेल्या तीस वर्षांत त्यांनी तीन वेगवेगळ्या कंपनीत कार्य केलंय. सध्या खमंग फूडस नावाने त्या स्वतःचा व्यवसाय करत आहेत.

लहानपणापासूनच रामदास स्वामींविषयी कुतूहल होतं. त्यांचे मनाचे श्लोक मुखोद्गत केले होते. पुढे जाऊन त्याचे अर्थ अनेकदा वाचले. दासबोध वाचला. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकाराने त्याचे अर्थ समजत गेले. मध्यंतरी मनाच्या श्लोकाचा अर्थासहित पुस्तकवाचन करून त्याची ऑडिओ क्लिप सर्वांना पाठवली. तो उपक्रम सर्वांनाच आवडला. जसं त्यांच्या मनात होतं तसंच इतरांनीही त्यांना सुचवलं की, आता निरूपण त्यांनीच करावं.  आणि दासनवमीच्या दिवशी सज्जनगडवर जाऊन या उपक्रमाचा श्रीगणेशा केला.

ह्यात समर्थांनी आपल्याच मनाला उपदेश केलाय. अध्यात्म जाणून घ्यायचे अनेक मार्ग आहेत. पण सरळ सोप्या मार्गाने जाऊन अध्यात्म/परमार्थ/मोक्ष हे जाणून घेण्यासाठी मनाचे श्लोक याचा अभ्यास करावा. ते वाचताना जो अर्थ त्यांना कळला तो या उपक्रमात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या करत आहेत. त्यात चालू घडामोडी चे दाखले, पौराणिक कथा, साधू संतांचे दाखले हे असतील. या शिवाय पुढच्या पिढ्यांनी याचा अभ्यास करावा म्हणून हे व्यवस्थापन आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसा अजूनही उपयुक्त आहे हे त्या मांडत आहेत. सामान्य माणसाचं मन कायम संसारात ओढ घेतं आणि गुंतत जातं, त्यात त्याला खरं सुख कधी मिळत नाही, त्यामुळे त्यातून बाहेर पडून अध्यात्माकडे आणि शेवटी मोक्षाकडे म्हणजेच चिरंतन सुखाकडे कसं जायचं हे समर्थांनी अतिशय छान पद्धतीने सांगितले आहे. हेच आहेत समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजेच मनोबोध.

मनाचे श्लोक क्रमांक एक

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ll
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ll 

पहिला श्लोक हे मंगलाचरण आहे. सर्व गण आणि गुणांची देवता ज्यांना अग्रपूजेचा मान आहे त्या गणेशाला आपण वंदन करूयात असं समर्थ म्हणत आहेत. ही नुसतीच सगुणभक्ति नसून तो निर्गुणाचा म्हणजेच परमेश्वराचा परमतत्वाचा आरंभ आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.

तिथे इश शब्द आलेला आहे.. इश तत्व म्हणजे काय
ते जाणून घेण्यासाठी चार पायऱ्या आहेत

1. प्रतिमा रुप देव हे पहिली पायरी
2. अवतारी महापुरुष आणि त्यांचे चरित्र अभ्यासणे ही दुसरी पायरी
3. या महापुरुषांनी सांगितल्यानुसार अंतरात्म्याचा शोध घेण ही तिसरी पायरी.
समर्थ म्हणतात :
            सकळ देवांचे मूळ 
            तो हा अंतरात्म्याची केवळ ll 

4. निर्गुण निर्विकार निराकार अशा परब्रह्माचा शोध घेणे
ही चौथी पायरी

यातल्या पहिल्या दोन पायऱ्या सगुण भक्तीच्या
आणि पुढच्या दोन पायऱ्या निर्गुण भक्तीच्या

यानंतर वाणीची देवता शारदा म्हणजेच सरस्वती देवी हिला नमन करून आपण आपल्या कार्याला सुरुवात करुया असं समर्थ सांगत आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाणीची अधिष्ठात्री सरस्वती हिला वंदन करत आहेत.

त्यामुळे बुद्धीची देवता गणेश आणि वाणीची देवता सरस्वती म्हणजेच शारदा यांना आपण वंदन करूयात असं समर्थ सांगत आहेत. समर्थांचा जसा अंतिम टप्पा परमतत्वात विलीन होणे हा उपदेश ते आपल्या मनाला देऊ इच्छितात त्याचप्रमाणे आपल्या जीवनात पण काहीतरी ध्येय असावा आणि त्याची सुरुवात अर्थातच सगुण रूपात म्हणजे दृष्टिक्षेपात असलेल्या यशासाठी ध्येय ठेवणे आणि त्यासाठी आपल्या बुद्धीने आणि भाशेने त्यावर विजय मिळवावा असा अर्थ मला समजतोय. त्यासाठी नियोजन.. कठोर परिश्रम.. योग्य साधनांचा अचूक वाप आणि बरंच काही आपण या अनुषंगाने बघू जेणेकरून आपण आयुष्यात यशस्वी होऊ.

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.