Pune : पुणे गारठले ; तापमान 13 अंशापर्यंत घसरले 

एमपीसी न्यूज – राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरूवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील नीचांकी 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिक येथे मंगळवारी सकाळी झाली.
राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून गारठा कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पुण्यातही तापमान 13 अंशापर्यंत घसरले आहे.
राज्यात निरभ्र आकाश असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असला, तरी आता कमाल तापमानाही चढ-उतार होत आहेत. राज्यातील किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. उन्हात गेल्यावर अंगाला चटका बसत असताना, सावली असलेल्या ठिकाणी मात्र गारठा जाणवू लागला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी किमान तापमानात 1 ते 2 अंशांची घट झाली असून, बऱ्याच ठिकाणी तापमान 13 ते 15 अंशांच्या दरम्यान आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातसुद्धा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. मंगळवारी पुण्यात किमान तापमान 12.9 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्याचबरोबर कमाल तापमानातही घट होऊन 33 अंशांपर्यंत आले आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी असे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. यामुळे स्वेटर व शाली पुन्हा कपाटातून बाहेर पडू लागल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.