Sinhagad – सिंहगडावर इतरही ई-वाहनांना प्रवेश मिळण्यासाठी प्रशासनाकडून चाचपणी सुरू

एमपीसी न्यूज : सिंहगडावर (Sinhagad) जाण्यासाठी पीएमपीच्या ई-बससह इतर ई-वाहनांना प्रवेश देता येईल का, याबाबत प्रशासनाकडून चाचपणी केली जात आहे. असे झाल्यास आतापर्यंत गडावर जाण्यासाठी जीपची सेवा पुरविणार्‍या स्थानिकांचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकतो. मात्र, यासाठी त्यांना ई-वाहने खरेदी करावी लागणार आहेत.

सिंहगड पायथ्यापासून गडावर (Sinhagad) जाण्यासाठी फक्त पीएमपीच्या ई-बसलाच परवानगी देण्याचा निर्णय वन खात्याने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र दिनापासून सुरू झाली आहे. यासाठी पीएमपीने चार ई-बस या मार्गावर नियुक्त केल्या आहेत. यासाठी लहान मुलांना 25, तर मोठ्यांसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. या बससाठी गडावर चार्जिंग पॉइंटही तयार करण्यात आला आहे.

PMC News : महापालिका हद्दीतील 23 गावांचा पाणीपुरवठा अद्यापही वार्‍यावरच..

मात्र, या निर्णयाचे उलटसुलट पडसाद उमटत आहेत. या निर्णयामुळे गडावर जाण्यासाठी जीप सेवा पुरवणार्‍या स्थानिकांचा रोजगार गेला आहे. वाढत्या पर्यटक संख्येला ई-बस पुरेशी सेवा देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ई-बस सेवा सुरु करण्यामागे पर्यावरण संवर्धन हाच हेतू आहे. त्यामुळे इतर ई-वाहनधारकांनाही त्यांची वाहने गडावर नेण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांनी स्वत: ई-वाहन अथवा ई-बस खरेदी केल्यास त्यांनाही गडावर (Sinhagad) पर्यटकांची वाहतूक करता येऊ शकेल.

”याबाबत आम्ही वन विभागाशी चर्चा करत आहोत. निर्णय अद्याप झालेला नाही,” असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.