Pimpri :रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनने केला वल्लभनगर आगाराचा कायापालाट

चालक, वाहकांसाठी बेड, 'सीसीटीव्ही' कॅमे-याचे गुरुवारी दिवाकर रावते यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज -रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनने पिंपरीतील वल्लभनगर आगाराचा कायापालाट केला असून चालक, वाहकांना रात्री झोपण्यासाठी डबलबेडची व्यवस्था केली आहे. भिंतीना रंग, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आगारात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले असून याचा लोकार्पण परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि.24) दुपारी एक वाजता होणार आहे.

याबाबतची माहिती रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यावेळी 3131चे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ. शैलेश पालेकर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारात राज्यभरातून बस येतात. रात्रीच्या मुक्कामी बसवरील चालक, वाहकांना आगारात झोपण्यासाठी व्यवस्था नव्हती. त्यांना थंडीच्या दिवसामध्ये जमिनीवर झोपावे लागत होते. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या वतीने 75 डबलबेड बसविले आहेत. त्यावर 150 चालक, वाहक झोपू शकतात.

तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आगारात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भिंतीना रंग देऊन चकाचक करण्यात आल्या असून आगारातील स्वच्छतागृहांची देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. यासाठी 20 लाख रुपये खर्च झाला आहे, असे रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.