Talegaon : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील सामान जळून खाक

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन भागातील आनंदनगर येथे रविवारी पहाटे एका बंगल्यातील फॅन व फ्रिजला शॉट सर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातील सामान जळून खाक झाले. सुदैवाने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला नाही. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता पुरुषोत्तम मटांगे (वय५४,रा. आनंदनगर, तळेगाव स्टेशन, ता. मावळ, जि. पुणे) यांच्या बंगल्यातील फॅन व फ्रिजला रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली. स्मिता मटांगे आणि
पुष्पलता पुरुषोत्तम मटांगे (वय८६) या दोघी मायलेकी घरात राहतात. सुदैवाने दोघीही बचावल्या. या आगीत दोन पंखे, कपडे, बेड, फ्रीज, घरगुती भांडी, वायरिंग जळून खाक झाले. नजीकच राहणाऱ्या अक्षय राधाकृष्ण येणारे या युवकाने व तुकाराम मोरमारे यांनी प्रसंगावधान राखून घरातील गॅस सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करून गॅस सिलिंडर बाहेर काढले. तळेगाव नगर परिषदेत कर वसुली अधिकारी म्हणून काम करीत असलेले तुकाराम मोरमारे आणि पत्रकार राधाकृष्ण येणारे यांनी तातडीने 100 नंबरशी संपर्क साधला.

घरात आग पसरली असतानाही अक्षय याने धाडसाने वीज पुरवठा बंद केला. जीवाची पर्वा न करता अक्षय याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचे वृत्त समजताच तळेगाव नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी पद्मनाभ कुल्लूरवार यांनी
तळेगाव एमआयडीसीचा अग्निशमन बंब उपलब्ध होण्यासाठी वेगाने हालचाली केल्या. तसेच घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.

दरम्यान, साडेतीनच्या सुमारास तळेगाव एमआयडीसीचा अग्निशमन बंब दाखल झाला. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग पूर्ण विझविण्यात यश आले. नगरपरिषदेचा अग्निशमन बंब असता तर वेळ वाचला असता. आग लवकर आटोक्यात येण्यास मदत झाली असती. तळेगाव शहरात आगीची दुर्घटना घडल्यास आग विझविण्यासाठी तळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन बंबावर अवलंबून रहावे लागते. ही तळेगाव शहराच्या दृष्टीने भूषणावह बाब नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.