Talegaon Dabhade : नगराध्यक्ष व सत्ताधारी भाजपा यांच्या वादातून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा – गणेश काकडे 

एमपीसी न्यूज – नगराध्यक्षा व सत्ताधारी भारतीय जनता पार्टी यांच्या वादातून शहराच्या विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. हा नागरिकांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे. तर सत्तारुढ भाजपाने नगराध्यक्षांनी घेतलेल्या विशेष सभेवर बहिष्कार टाकून त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना घरचा आहेर दिला आहे. अशी टिका नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली.

तर सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर वाटेल ते निर्णय घेत असून सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या कोलमडला असल्याचे शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे म्हणाले.

शहर सुधारणा व विकास समितीने तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गणेश काकडे बोलत होते. यावेळी शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे आदी उपस्थित होते.

गणेश काकडे म्हणाले, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी 28 सप्टेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. परंतु, त्यांना त्यांच्या भाजपच्या सदस्यांनीच विरोध केला. यामुळे विकास कामासाठी घेतलेली विशेष सर्वसाधारण सभा गणपूर्ती अभावी नगराध्यक्षांना रद्द करावी लागली. नगराध्यक्षा व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांच्यामध्ये एक विचार नसल्याने तळेगावच्या विकासाचे विषय लांबणीवर पडले आहेत.

नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षा मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनीच केला आहे. सत्ताधारी भाजपचा साडेचार वर्षांतील नगरपरिषदेतील कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. तसेच, शहराचा विकास खुंटला असल्याचेही गणेश काकडे म्हणाले.

किशोर भेगडे म्हणाले, की सत्तेमध्ये एका विचाराचे सदस्य असतील तर शहराचा विकास साध्य होतो. मी शहराच्या विकासाचा दूरदृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून

उपसूचना दिल्या. याचा अर्थ मी विकासकामांना विरोध करतो असा होत नाही. या अगोदर मी सुभाष मार्केट, इंद्रायणी जॅकवेलच्याबाबत देखील उपसूचना दिल्या होत्या. उपसुचना दिली म्हणून रस्ते रखडले अशी सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. ती उपसुचना का केली? हे तपासले नाही, किशोर भेगडेंच्या उपसुचनेचा आदर भाजपा केव्हा पासून करायला लागली अशी उपरोधित टीकाही भेगडे यांनी केली.

ते म्हणाले माझी उपसुचना ऐकली असती तर तळेगावकर नागरीकांना दुषित पाणी प्यायला लागले नसते. तसेच, सुभाष मार्केटमधील भाजी मंडईसाठी मोठा खर्च होऊन देखील नगरपरिषदेला यामधून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. त्याठिकाणी शासकीय, निमशासकीय, कार्यालये एकाच छताखाली आली असती तर नागरीकांच्या दृष्टीने हिताचे झाले असते. नवीन पाण्यासाठी पाइपलाइन,भुयारी गटार योजना आदी प्रश्नावर सत्ताधारी भाजपवर किशोर भेगडे यांनी जोरदार हल्ला चढविला.

सन 2017 -18 व 2018- 2019 ची पाणीपट्टी व घरपट्टीची बिले वाटप केली गेली नाही त्यामुळे नागरीकांना व्याज व दंड भरावे लागून नये म्हणून ते नगराध्यक्षांनी द्यावेत अशी मागणीही त्यावेळी भेगडे यांनी केली होती. तसेच सहा सहा महिने नगराध्यक्षांना झालेल्या ठरावांवर सही करायला वेळच नाही अशी मिश्किल टिपण्णी भेगडे यांनी यावेळी केली.

सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर वाटेल ते निर्णय घेत असून, चतुर्थ वार्षिक कर आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करू नये म्हणून मी उपसूचना दिली होती. तरी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात अडकलेला समाज अधिकच आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे, असेही भेगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.