Tathavde News : पत्नीने फक्त भात केला म्हणून पती बाहेर जेवायला गेला; पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पत्नीने जेवणासाठी फक्त भात केला. त्यामुळे पती जेवायला बाहेर गेला असता पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ताथवडे येथे रविवारी (दि. 7) घडली. मायादेवी लक्ष्मण अंककले (वय 25, रा. सुभाष पवार यांची चाळ, ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजता मायादेवी यांचे पती जेवणासाठी घरी आले. त्यावेळी मायावती यांनी जेवणासाठी फक्‍त भात केला होता. त्यावर ‘मला जेवायला भाकर लागते, मी बाहेर जेवायला जातो’, असे सांगून पती घराबाहेर गेले. त्यावेळी मायदेवी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पती घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मायदेवी यांचा मृतदेह पोलिसांनी सासरकडील नातेवाइकांच्या ताब्यात दिला नाही. मयत मायादेवी यांचे नातेवाइक कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आहेत. मंगळवारी दुपारी ते नातेवाइक पिंपरीत आले. यामुळे मायादेवी यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.