Pimpri : नियमभंग करणा-या वाहन चालकांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा

किरकोळ कारणांवरूनही फौजदारी कारवाई होत असल्याने नागरिक हैराण

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. मोटार व्हेईकल ऍक्ट तसेच भारतीय दंड संहिता कलम 279 या दोन्हींचा वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम सध्या शहरात सुरु आहे. मात्र, किरकोळ कारणांवरूनही फौजदारी कारवाई होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. या प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन आणि सध्याचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणा-यांवर वचक निर्माण करण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली. तसेच कठोर कारवाई आणि पोलिसांचा वावर वाढवून अपघात कमी करण्याचे प्रयत्न झाले. पण अजूनही अपघातांचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही.

अनेक प्रकरणात किरकोळ कारणांवरून देखील भारतीय दंड संहिता कलम 279 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तयार होते. नियमांचे उल्लंघन करणा-यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण ज्या चुकांमध्ये मोटार व्हेईकल ऍक्टनुसार कारवाई होऊ शकते अशा प्रकरणांमध्ये देखील फौजदारी कलमांचा वापर केला जात आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.

चिंचवड येथील नागरिक शंकर रक्कासगी यांच्या बाबतीत वैतागणारा एक प्रसंग घडला आहे. शंकर मंगळवारी सायंकाळी काळभोर नगर येथून विरुद्ध दिशेने वाहन चालवत होते. चिंचवड वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. शंकर यांनी आपली चूक मान्य करत रितसर पावती करण्याची विनंती केली. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 279 अन्वये फौजदारी कारवाई केली. या कारवाईसाठी देखील शंकर यांनी सहमती दर्शवली. मात्र, वाहतूक पोलिसांकडून त्यांना वाहतूक विभाग, पोलीस चौकीत तासंतास ताठकळत बसवून ठेवले. त्यामुळे ज्या महत्वाच्या कामासाठी शंकर यांना जायचे होते, त्यासाठी त्यांना वेळेत पोहोचता आले नाही. विरुद्ध दिशेने जाण्यासाठी वळून पाच ते दहा मीटर पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भरधाव वेगात अथवा कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गाडी चालवलेली नसताना देखील कठोर कारवाई केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया शंकर रक्कासगी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, फेब्रुवारी 2020 च्या सुरुवातीला एका प्रकरणाची सुनावणी करताना खडकी न्यायालयाने पोलिसांना फटकारले आहे. मोटार व्हेईकल ऍक्टनुसार वाहन चालकांवर कारवाई करणे आवश्यक असताना किरकोळ प्रकरणांमध्ये देखील वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम 279 प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. 279 प्रमाणे कारवाई केल्यास संबंधित व्यक्तीचे क्राईम रेकॉर्ड तयार होत असून त्याचा त्याच्या नोकरी आणि भविष्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. गंभीर प्रकारांमध्ये भारतीय दंड संहितेच्या 279 प्रमाणे कारवाई करावी. मात्र, सरसकट सर्वांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल न करता मोटार व्हेईकल ऍक्ट नुसार देखील कारवाई करायला हवी, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 या दोन महिन्यात अनुक्रमे 30 आणि 28 प्राणांतिक अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वाहन चालकाच्या निष्काळजीपणे वाहन चालवण्यामुळे हे अपघात झाले आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून भारतीय दंड संहिता कलम 279 तसेच 304 व इतर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारांमध्ये फौजदारी कारवाई व्हायलाच हवी. त्याव्यतिरिक्त वाहतुकीचे नियम मोडल्यावरून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. तर मोटार वाहन कायदा 185 अन्वये मागील महिन्यात एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन केवळ फौजदारी कारवाईवर लक्ष केंद्रित करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे म्हणाले, “वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियमभंग करणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जात आहे. किरकोळ चुकांमुळे अनेक मोठे अपघात होतात. त्यामुळे लहान चुका नागरिकांच्या जीवावर बेतणा-या आहेत. वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी कारवाईची मोहीम सुरु आहे. पोलिसांकडून जाणीवपूर्वक कोणालाही ताठकळत ठेवले जात नाही. त्याबाबत चौकशी करून योग्य कारवाईच्या सूचना दिल्या जातील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.