Talegaon : प्रेयसीला फिरविण्यासाठी त्यांनी चोरल्या चौदा दुचाकी

एमपीसी न्यूज – प्रेम आंधळे असते. ते काय करायला भाग पाडेल, याचा काही नेम नाही. अशाच तीन प्रेमवीरांनी प्रेयसीला फिरवण्यासाठी स्वतःकडे गाडी नसल्याने एक ना दोन तब्बल 14 दुचाकी गाड्या चोरल्या. पण पोलिसांनी बरोबर माग काढून तिघांनाही बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने केली. त्यांच्याकडून सहा लाखांच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

हिमांशू उर्फ पप्प्या योगेश सोळंखी (वय 20. रा.गुरुद्वारा मार्ग, दिघी), निखिल उर्फ सोनू संतोष जाधव (वय 20,रा.दिघी गावठाण), आशिष उर्फ अश्या रोहिदास जाधव (वय 21, चौधरी पार्क, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे परिसरामध्ये गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, तीन इसम सोमाटणे फाटा येथील अन्नपूर्णा हॉटेल जवळ एका स्कुटीवर येणार आहेत. त्यांचेकडे असलेली गाडी चोरी केलेली आहे. पोलिसांनी परिसरात सापळा रचून शिताफीने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या मोपेड दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

अटक केलेल्या तिघांकडे अधिक तपास केला असता त्यांनी तळेगाव दाभाडे, भोसरी, दिघी, फरासखाना, विमानतळ, हडपसर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दुचाकीचोरीच्या 12 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी चोरलेल्या सर्व दुचाकी घरापासून काही अंतरावर लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यांच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे तळेगाव दाभाडे, भोसरी, वाकड, फरासखाना, विमानतळ, वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, दिघी, पोलीस ठाण्यातील दोन आणि हडपसर पोलीस ठाण्यातील चार असे एकूण 12 गुन्हे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुकत श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस उपनिरीक्षक निलेश बोडखे, पोलीस कर्मचारी धनंजय भोसले, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.