Rahul Narvekar : नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे हे आहे ‘पिंपरी-चिंचवड’ कनेक्शन!

एमपीसी न्यूज – विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे पिंपरी-चिंचवड चांगले परिचित आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. 
भाजप आमदार असलेल्या राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस असा झाला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांचे नाव जाहीर झाले आणि पिंपरी-चिंचवडकरांना ते नाव परिचित वाटले.
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली होती, तर आमदार लक्ष्मण जगताप हे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोणीही स्थानिक नेता निवडणूक लढविण्यास तयार नव्हता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (Rahul Narvekar) ऐनवेळी राहुल नार्वेकर या तरुण उमेदवाराला रिंगणात उतरविले होते.

राहुल नार्वेकर हा बाहेरचा उमेदवार असल्याने मतदारसंघात फारसा प्रभाव पडणार नाही, हे स्पष्टच होते. पण या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने नार्वेकर यांचे पिंपरी-चिंचवड शहरात व शेजारील मावळ तालुक्यात येणे झाले होते. पिंपरी-चिंचवडकरांकडे त्यांनी मतांचा जोगवा मागितला होता. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत मतदारांनी त्यांच्या झोळीत मतेही टाकली होती.
या निवडणुकीत नार्वेकर यांना अपेक्षेप्रमाणे  तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना पाच लाख 12 हजार 226 मते, शेकापच्या लक्ष्मण जगताप यांना तीन लाख 54 हजार 829 मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना केवळ एक लाख 82 हजार 293 मतांवर समाधान मानावे लागले होते.
या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर नार्वेकर पिंपरी-चिंचवडमध्ये परत फिरकल्याचे ऐकिवात नाही. कोणत्याही जाहीर कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावल्याची माहिती उपलब्ध नाही.
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर पिंपरी-चिंचवडकरांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.