Pimpri : चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी भर पावसात बापाची धावपळ

सर्पदंश झालेल्या मुलीची मृत्यूच्या दाढेतून केली सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- पोटच्या चिमुरडीला सर्पदंश झाल्याचे समजताच वडिलांनी रात्रीच्या वेळी भर पावसात उपचारासाठी तीन-तीन रुग्णालयात धाव घेतली.  कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयापासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयापर्यंतचा प्रवास करीत अखेर मृत्यूच्या दाढेतून तिची सुखरूप सुटका केली. ग्रामीण भागातील वैद्यकीय असुविधा आणि रुग्णालयाचा आडमुठेपणा आणि मानवी स्वभाव यानिमित्ताने समोर आला आहे. 

खुशी मनोज तिंडरे असे जीवनदान मिळालेल्या चिमुरडीचा नाव आहे. तिचे वडील मनोज तिंडरे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. उदरनिर्वासाठी तिंडरे कुटुंबीय पुण्यात आले. मावळातील कान्हेगाव येथे ते वास्तव्यास आहेत. मनोज तिंडरे हे आई-वडील, बहिण, पत्नी आणि तीन मुलांसह तिथे राहतात. मनोज वाहनचालक म्हणून नोकरी करतात. तर, त्यांची आई भाजीपाला विक्री करते.

बुधवारी (दि. 17) तिंडरे कुटुंबीय झोपले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या चार वर्षाच्या खुशीला सापाने दंश केला. साप चावल्याने खुशी झोपेतून उठली. साप चावल्याचे लक्षात येताच मनोज तिंडरे हे भर पावसात खुशीला दुचाकीवरुन रात्री दीडच्या सुमारास कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले. दुचाकीला लाईट नसताना देखील रात्रीच्या अंधारात त्यांनी कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.  या ठिकाणी खुशीवर तात्पुरते उपचार करण्यात आले. परंतु, उलट्या थांबत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तळेगावातील जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. रुग्णवाहिका होती. पण चालक जागेवर नव्हता. त्यामुळे वेळ जात होता. वडिलांची घालेमल होत होती.

तासाभरानंतर चालक दाखल झाला. खुशीला तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तोपर्यंत खुशीच्या अंगात विष पसरले होते. तळेगावमध्ये आवश्यक ते उपचार होऊ शकत नसल्याने तिला पुण्यात जाण्यास डॉक्टरांनी सुचविले. त्यावेळी रात्रीचे तीन वाजले होते. वडिलांची घालमेल वाढली होती. एकेक क्षण महत्वाचा होता. पुण्यात आणण्याचे ठरल्यावर रुग्णवाहिकेचा चालक येण्यास तयार होत नव्हता. त्याची मनधरणी केल्यानंतर तो तयार झाला. खुशीला वाकड येथील सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी योग्य औषधोपचार करुन खुशीला वाचविले. पण आता हॉस्पिटलचे एक लाख रुपयांचे बिल देण्यासाठी खुशीला हॉस्पिटलमध्येच थांबवून घेतले आहे. मनोज तिंडरे यांनी गारपीट पावसाची तमा न बाळगता आपल्या मुलीचा जीव वाचवला. पण आता हातावरचे पोट असलेल्या तिंडरे यांच्यासमोर बिल कसे भरायचे हा प्रश्न उभा आहे.

मनोज तिंडरे म्हणाले, ” मध्यरात्री साप चावल्यामुळे खुशी मोठ्याने रडायला लागली. पावसाची पर्वा न करता तात्काळ दुचाकीवरुन कान्हे फाटा येथे रुग्णालयात घेऊन गेलो. केवळ मुलीचा जीव वाचवायचा म्हणून एवढा प्रयत्न केला. डॉक्टरांनी योग्य औषधोउपचार करुन तिला वाचविले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.