Dehugaon News: तुकोबांच्या पादुका 40 वारकऱ्यांसह ‘शिवशाही’तून पंढरपूरकडे मार्गस्थ

एमपीसी न्यूज – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका आषाढी वारीसाठी आज (सोमवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या दोन एसटी बसने संस्थानचे पदाधिकारी,  मानकरी, वारकरी, टाळकरी असे 40 वारकरी सहभागी झाले आहेत. बस सोबत पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

 

आषाढी एकादशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला श्रीक्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. हरिभक्तीच्या छंदात दंग होऊन, विठूनामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन  पायी श्री विठ्ठलाच्या भेटीला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर यंदाही कोरोनाचे सावट आहे.  वारीची परंपरा जपण्यासाठी एसटी बसमधून पादुका पंढरपूरला नेण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने पंढरीची वारी पायी चालत न होता, एसटीच्या सजविलेल्या बसने होत आहे. महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी पादुका बसने जात आहेत.

तुकोबांच्या पादुका पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात सकाळी पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले.  सकाळी साडे आठच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या दोन एसटी बसमधून पादुका मार्गस्थ झाल्या. एका बसमध्ये 20 असे 40 वारकरी बसमध्ये आहेत. पादुकांसोबत पालखी सोहळा प्रमुख, संस्थानचे अध्यक्ष, चोपदार, विणेकरी, पालखीचे भोई, चौघडा, शिगाडे, गरुडटक्का, पताकाधारक वारकरी, पखवाज वादक, टाळकरी असे 40 वारकरी बसमधून पंढरपूरला निघाले आहेत.  या बस समवेत पंढरपूर पर्यंत व परत येईपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे. चार वाजेपर्यंत वाखरीत बस पोहचतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.