Maratha Arakshan : आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या’

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha Arakshan) मुद्यावर खासदार उदयनराजे भोसलेंनी अनेकांची भेट घेतली. आता मात्र त्यांनी थेट महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण तरी द्या; अन्यथा आम्हाला विष पिऊन मरु द्या’, या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या, असं म्हणतं सरकारला इशारा दिला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात खा. श्री. छ. उदयनराजे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर करणार्‍यांनी शेकडो वर्षे या समाजाच्या प्रश्‍नांना झुलवत ठेवले आहे. मराठा समाजातील तरुणांना गृहीत धरून सत्तेवर बसणार्‍यांनी आरक्षणाचा प्रश्‍न लोंबकळत ठेवला. इतर समाजांना आरक्षण देताना गांभीर्याने विधाने करणारे व कायदेशीर बाजू पुरेपूर लावून धरणारे सत्ताधारी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नामध्ये मात्र मेखा मारून बसले आहेत. अलीकडे होत असणार्‍या बैठकांमध्येही मला फारसे गांभीर्य दिसत नाही, असे खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.