Congress: नाबाद काँग्रेस @138

एमपीसी न्यूज – देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष (Congress) उद्या 139 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. तो राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 28 डिसेंबर 1985 मध्ये मुंबई येथील तेजपाल संस्कृत पाठशाळेत काँग्रेसची स्थापना झाली होती. यानिमित्त युवक काँग्रेसचे राष्ट्रीय मिडिया पॅनलिस्ट गौरव चौधरी यांनी लिहिलेला लेख…!

स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही आणि स्वराज्य म्हणजेच लोकराज्य हा सिद्धांत काँग्रेसने लोकांमध्ये रुजवला. काँग्रेसने उभारलेली स्वातंत्र्याची चळवळ केवळ ब्रिटिश सत्ता घालवण्यासाठी नव्हती. तर, त्यांच्या जागी कुठलीही हुकूमशाही न येता लोकांचे राज्य लोकराज्य प्रस्थापित व्हावे यासाठी प्रयत्न होते. हिंदू-मुस्लिम,स्त्री-पुरुष,कुठल्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व मताने मान्य केलेल्या सरकार हाच लोक राज्याचा अर्थ काँग्रेस प्रणित स्वराज्य या संकल्पनेत होता. आज तब्बल 138 वर्ष पूर्ण झालेल्या पक्षात आज देखील देशात खऱ्या उदांत राष्ट्रवादाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घालून काँग्रेस पक्षाने लोकशाहीची बीजे रुजवली फुलवली आणि आज त्याचं एक वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात तब्बल 55 वर्ष केंद्रीय सत्तेत विराजमान असलेला काँग्रेस पक्ष हाच मूलतः भारताचा मुख्य प्रवाह आहे. कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छच्या रणापासून ईशान्य भारतापर्यंत दीर्घ काळापासून काँग्रेसचे ठळक अस्तित्व अबाधित आहे. खरंतर प्रचंड विविधतेतून उभा राहिलेला भारत हे जगातील एकमेव राष्ट्र आहे. या विविधतेला जपणारा आणि संगोपन करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची ओळख त्याच्या पक्षाच्या वैचारिक दिशेने होत असते. त्यात राजकीय आर्थिक आणि सामाजिक विचारातून पाहिले जाते. काँग्रेसची विचारसरणी बंदिस्त चौकटीतली अजिबात नाही. सातत्य कायम ठेवून बदल स्वीकारणे हा या विचारसरणीचा आत्मा आहे. अनेक कठीण प्रसंगांना धैर्याने समोर जाण्याची शक्ती या पक्षाला वेळोवेळी प्राप्त झाली आहे. वैचारिक तटस्थता आणि राजकीय साचलेपण ही काँग्रेस पक्षाची ओळख नाहीच.

परस्परांशी कुठलेही साधर्म्य नाही असे वैविध्य एका माळेत गुंफून आधुनिक भारताची उभारणी करण्याची भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीत स्थापनेपासून तर आत्तापर्यंत आहे. सर्व धर्मीयांना बरोबर घ्यायचे सर्वांना समान न्याय संधी मिळवून द्यायची भाषिक धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नतेत जराही भेदभाव न करता सर्व वैशिष्टांचा गुणांचा सन्मान करायचा हाच काँग्रेसचा मूलभूत विचारांचा हा झेंडा आजही कार्यकर्त्यांच्या हातात घट्ट आहे. लोकांचे राज्य हे संकल्पना मानवी मूल्यांच्या संकल्पनेतून पुढे आली आहे. काँग्रेस विचारधारेमध्ये हीच संकल्पना साकारली आहे, याचे श्रेय महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले जाते. स्वातंत्र्यानंतर खरंतर 1950 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 72 पैसे होते. आयुर्मान 27 वर्ष आणि साक्षरता 17 टक्के होती. केवळ एक टक्का गावांमध्ये विज होती अशावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना आखत देशाचा गाडा सुरू केला. अगदी सुरुवातीच्या काळात देशांमध्ये धरणे औद्योगिक कारखाने व्यापार वृद्धी याचा पाया घातला. मोठमोठे प्रकल्प उभारून देशाला विकासाच्या खऱ्या स्वरूपावर आणण्यासाठी भर दिला.

लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. तर सोबत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावची घोषणा केली. बँकेचे राष्ट्रीयकरण करून गरिबांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. हरितक्रांती,धवल क्रांती सोबतच अणुचाचण्या घेऊन देशाला संरक्षणामध्ये सिद्ध केले. राजीव गांधी यांनी दूरसंचार संगणक क्रांती आणली. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान विकसित करून देशाच्या विकासाला खरी गती (Congress) मिळाली. नरसिंहराव यांच्या नेतृत्वामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प संसदेत सादर केला आणि अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रे खुली केल्याने वेगाने प्रगती केली ही गोष्ट कधीही नाकारता येणार नाही. मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांसाठी हा निर्णय आशादायी ठरला. डॉ. मनमोहन सिंग यांनी आधार कार्ड, अंतराळ विमान,अन्नसुरक्षा कायदा,मनरेगा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे अनेक कार्यक्रम राबवून देशाची महासत्तेकडे वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू केली. मंगळावर यान पाठवून अंतराळ ताकदीची चुणूक संपूर्ण जगाला दाखवून दिली.

Mulshi : टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक

स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोकांच्या समूहासोबत लोक चळवळ जन चळवळ उभारून स्वातंत्र्याचा लढा उभारण्यापासून ते अगदी सेवा दलाच्या माध्यमातून सकाळी प्रभात फेरी काढून गावागावात लोकांना जागृत करत. त्यांच्यासोबत असण्याचा विश्वास निर्माण करण्याचे काम काँग्रेसच्या माध्यमातून झाले आहे. आपण सर्वजण अनुभवत आहोत आठ,नऊ वर्षात सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सत्तेचे केंद्रीकरण, हुकूमशाही,दबाव तंत्र, स्वायत्त संस्थांमध्ये, केंद्रीय तपास यंत्रणा मध्ये हस्तक्षेप. अनेक राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता स्थापन करणे, अनेक भ्रष्टाचारांना पाठीशी घेणे, सामाजिक तणाव आणि अराजकता निर्माण निर्माण करण्याचे काम चालू आहे. लोकशाहीची व्याख्या लोकांपासूनच दूर नेण्याचा खटाटोप सरकारच्या माध्यमातून चालवला (Congress) जात आहे, हे पाहता अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने देशाला विकसनशील देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणले. सर्व समावेशक पद्धतीचेच राजकारण देशांमध्ये चालवले आणि हीच भारताची खरी ओळख झाली. स्वातंत्र्य, समता ,बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय, यासोबतच सामाजिक सलोखा जपत काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिला. याउलट धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करणारे, काँग्रेसमुक्त भारत अशी वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसमोर काँग्रेस या लोकशाहीच्या मैदानावर आणि लोकतांत्रिक धावपट्टीवर 138 वर्ष नाबाद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.