Maharashtra Politics : काका मला माफ करा! – ‘उपमुख्यमंत्री’ अजितदादा पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात 'महाशक्ती'कडून तिसरा भूकंप

एमपीसी न्यूज : (गोविंद घोळवे, राजकीय सल्लागार संपादक) – महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics) राजकारणात आज तिसरा राजकीय भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. ‘काका मला वाचवा’, म्हणण्याऐवजी, ‘काका मला माफ करा’, असं म्हणत अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच ‘हायजॅक’ केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bhosari : किरकोळ कारणावरून टोळक्याकडून कुटुंबीयांना मारहाण

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात आज मोदी-शहा धक्का तंत्राचा राजकीय पॅटर्न पुन्हा एकदा यशस्वी केला आहे. तसेच सत्तेपुढे शहाणपण आणि गाढवापुढे ज्ञान तसेच मूर्खापुढे तत्त्वज्ञान चालत नसते, या म्हणीचे प्रत्यंतर आज आले आहे.

 

2019 मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाच राजकीय रित्या धोपीपछाड करून धक्कातंत्र अवलंबविण्यात यश मिळविले होते. याची राजकीय सल मोदी-शहा यांच्या मनात गेली अडीच वर्षे होती.

 

एक वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपने दोन्ही काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा राजकीय बदला घेण्यात राजकीय यश संपादन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपने लोटस ऑपरेशन यशस्वी पार पाडल्याचे स्पष्ट झाले होते.

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 40 आमदार सूरत मार्गे गुवाहाटी, गोवा मार्गे बाहेर पडले व शिवसेनेत उभी फूट प़डली होती. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात हा सर्वात मोठी भूकंप महाशक्तीने घडवून आणला होता.

 

तसाच दुसरा राजकीय भूकंप आज करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमघ्ये उभी फूट पाडली आहे. जवळपास 40 आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल.

 

मात्र वरील सर्व नेतेमंडळींची नावे पाहता, खरोखरच पुतण्याने बंड केले का काकांचा छुपा पाठिंबा आहे, अशी देखील चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे ही नेते मंडळी शरद पवार यांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख होय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली अटना म्हणजे, काका मला वाचवा अथवा भाजपबरोबर जाण्यासाठी मूकसंमती द्या, असा तर प्रकार नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

 

राजकारणात तत्त्व, नीतीमत्ता, निष्ठा म्हणजे कुचेष्टा झाली आहे. सत्तेसाठी सर्वकाही क्षम्य आहे, अशीच पद्धत गेली आठ-दहा वर्षे महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात सर्रास सुरू आहे. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा, याबाबत जनतेच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, असाच पॅटर्न सुरू आहे.

 

उपमुख्यमंत्री अजितदादांचा हा दुसरा शपथविधी म्हणजे खरोखरच धक्कातंत्र आहे, असे म्हटले तर वावगे नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस वरील घडामोडींना षडयंत्र म्हणत असले तरी मोदी-शहा यांनी आपण सत्तेसाठी कोणताही पॅटर्न राबवू शकतो, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. किंवा विरोधकांच्या भाषेत भाजपने निरमा वॉशिंग मशीन काढली आहे. आमच्याकडे या स्वच्छ आणि पारदर्शक व्हा आणि राजकारणात सुखाने राहा, हा नवीन पॅटर्न भाजपने गेल्या काही वर्षात देशभरात यशस्वी राबविला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना लोकसभेचे महत्त्व सर्वोच्च आहे. त्यांना कोणत्या राज्यात कोणते सरकार आहे, याचाही काहीही देणे-घेणे नाही. कारण सर्वच राजकीय पक्षांच्या कुंडल्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कोणी ‘धक्का’ म्हणा किंवा ‘खोका’, परंतु भाजप संधीचा सोडत नाही मोका, हे भाजपने अनेकवेळा दाखवून दिले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करून देखील आपण महाराष्ट्रातील खासदारांचा 45 चा आकडा पार करू शकत नाही, असा सर्व्हे येताच महाराष्ट्राच्या राजकारणातील बलाढ्य पुतणे अजितदादा पवार यांना आपल्याबरोबर घेऊन आम्ही शरद पवार यांच्या राजकारणाला घरातून सुरुंग लावू शकतो, हे दाखवून दिले आहे.

 

आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अजित पवार यांची वर्णी लागली तर आश्चर्य नको, कारण १६ आमदार अपात्र झाले तर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे अजितदादांना मुख्यमंत्री करून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा कार्ड खेळण्यास मागे-पुढे पाहणार नाही. कारण सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस सोडले तर अजितदादांच्या एवढा मोठा नेता भाजपमध्ये नाही.

 

काँग्रेस,-राष्ट्रवादी नेतेमंडळींवर गेल्या चारक दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप केला होता आणि आज राजकीय भूकंप घडवून आणला. याचाच अर्थ सत्तेपुढे कोणाचेही न चाले शहाणपण… आता जनता जनार्दन करेल आपले मतप्रदर्शन! पण सध्या तरी भाजप जिंकली असून केंद्रात सत्ता असेपर्यंत अनेक राज्यात असे धक्कातंत्र होणार हे स्पष्ट झाले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  हे अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते असून कामात वाघ माणूस ओळखले जातात. गेली तीस वर्षे मी त्यांचे राजकारण जवळून पहात आहे. शब्दाचा पक्का नेता, एखादे काम होणार तर हो अन्यथा नाही, म्हणून तोंडावर स्पष्टपणे सांगणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापेक्षा फार मोठा नेता गळाला लागला आहे, हे मान्य करावेच लागेल.

 

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 50 वर्षे राजकारण करणारे शरद पवार आता वरील भूकंप शमविण्यात कसा पुढाकार घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे, कारण पवार यांना आपत्ती व्यवस्थापनाचा फार मोठा अनुभव आहे.

 

सध्या तरी भाजप महाशक्ती पॉवरफुल असून भविष्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics ) राजकारणात अजित पवार हेच मोदी-शहा यांची प्रथम पसंती असल्यास आश्चर्च वाटायला नको. पाहूया… भविष्यात कोणता राजकीय भूकंप होणार आहे?

 

– गोविंद घोळवे
राजकीय सल्लागार संपादक

एमपीसी न्यूज

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.