Talegaon Dabhade News : नॅशनल हेवी इंजिनिअरींग कंपनी पूर्ववत सुरु करा

कृती समितीची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरींग सहकारी कंपनी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नॅशनल हेवी इंजिनिअरींग सहकारी कंपनी बचाव कृती समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात आली. याबाबत नॅशनल हेवी इंजिनिअरींग कंपनीचे कामगार व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी अमित शहा यांना निवेदन दिले. हे निवेदन सुदुंबरे येथील NDRF च्या कार्यक्रमानंतर दिले त्यांना हे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके उपस्थित होते.

या निवेदनावर कृती समितीचे सहसचिव बाळ भिंगारकर यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटले आहे की, कंपनी गेली अनेक वर्षापासून बंद असून येथील कामगारांना चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापन हे कंपनी पुर्ववत सुरु करून उत्पादन पुन्हा सुरु करू अशी निव्वळ आश्वासने देत आहेत. त्यांनी  आत्तापर्यत यामध्ये कोणतीही प्रगती केली नाही,तसेच गेली अनेक वर्षे कंपनी बंद असल्याने येथील कामगार आर्थिकदृष्टया खचला आहे.

यामुळे काही कामगारांचे मृत्यू देखील झाले आहेत, यासाठी कंपनीच्या ताब्यातील वाढीव जागा शासकीय कामकाजासाठी विक्री करून त्या पोटी मिळणारी रक्कम कंपनीचे कर्ज फेडणे व कामगारांचे थकीत पगार व इतर बाबी साठी खर्च करून कामगारांना सहकार्य करावे, असे निवेदन कृती समितीने दिले आहे.

तसेच नॅशनल हेवी इंजिनिअरींग कंपनीच्या कामगार को- ऑप. सोसायटीच्या वतीने निवेदन यावेळी देण्यात आले.यामध्ये कामगारांचे कंपनीने सोसायाटी मधून पैसे कापलेत परंतु ते परत केले नाहीत. ते परत मिळावेत म्हणून निवेदन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना दिले. यावर दोन्ही घटनांबाबत मी स्वतः लक्ष घालतो. असे आश्वासन शहा यांनी दिल्याचे भेगडे यांनी सांगितले.

सहकारी संस्थेने पूर्ववत उत्पादन सुरू करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गास आदेश देण्याची विनंती सर्व कामगार वर्गाकडून करण्यात आली असून मंत्रीमहोदयांनी विशेष लक्ष देऊन हा विषय मार्गी लावण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.