Vaccination News : महाराष्ट्रात शनिवारी विक्रमी 7 लाखांहून अधिक जणांनी घेतली लस

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. शनिवारी (दि.26) देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सात पर्यंत दिवसभरात सात लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे.

राज्यात आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने 3 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात सात लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.