Vadgaon Maval : लक्षात ठेवा, तुम्हाला मावळातूनच मुंबईला जायचंय – आमदार सुनील शेळके

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा मावळ राष्ट्रवादीकडून निषेध

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर शुक्रवारी (दि. 8) हल्ला झाला. या हल्ल्याचा मावळ राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोटोबा महाराज मंदीर ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. आतापर्यंत आपल्या चांडाळ चौकडीने देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पवार यांच्या निवासस्थानावर भ्याड हल्ला केला. यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देऊ. मावळ तालुक्यातून आपणाला मुंबईला जायचे, यापुढे आपल्या पिलावळीने असे कृत्य केल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपणांस रस्त्यावरून फिरकू देणार नाहीत, असा इशारा देखील आमदार सुनील शेळके यांनी दिला.

पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोटोबा महाराज मंदीर ते तहसीलदार कार्यालय असा निषेध मोर्चा काढला होता. यावेळी पंचायत समिती चौकात झालेल्या निषेध सभेत शेळके यांनी तोफ डागली.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सदावर्ते यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.अशाप्रकारे हिंसेला प्रवृत्त करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणार्‍यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यांच्या पुतळ्याचे भरचौकात दहन करण्यात आले. पोटोबा महाराज मंदिरा पासून निघालेल्या निषेध मोर्चात कार्यकर्त्यांनी पवार यांचे समर्थनार्थ घोषणा दिल्या.

यावेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, नगरसेवक किशोर भेगडे, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, पुणे जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी सभापती बाबुराव वायकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, कृष्णा कारके, माजी नगरसेवक सुदर्शन खांडगे, अरूण माने, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, माजी उपनगराध्यक्षा, सातारा जिल्हा निरीक्षक वैशाली दाभाडे, रायगड जिल्हा निरीक्षक रूपाली दाभाडे, मावळ युवती अध्यक्षा निशा पवार, वडगाव शहर अध्यक्ष प्रवीण ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष प्रवीण झेंडे, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, मावळ माजी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, नगरसेवक सुनील ढोरे, पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, तालुका ओबीसी सेल अध्यक्ष मंगेश खैरे, जिल्हा युवक सरचिटणीस विशाल वहिले, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, नगरसेवक राजेंद्र कुडे, सोमनाथ धोंगडे, सरपंच विजय सातकर यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करून समाज विघातक कृत्य करणाऱ्या भ्याड शक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

खांडगे म्हणाले की, लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांच्या आंदोलनात कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे. सामंजस्यपणाने या संपातून तोडगा निघावा यासाठी महाविकास आघाडी सरकार नेहमीच प्रयत्नशील होते. एसटी कामगारांनी या अनुषंगाने न्यायालयीन लढाई दिली आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकार योग्य दिशेने पुढे जात आहे.लोकनेते शरदचंद्र पवार साहेब सदैव जनसेवेचा वसा घेऊन काम करीत आहेत. अनेक समस्यांवर त्यांनी कायमच तोडगा काढून सर्व स्तरातील जनतेला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. समाजकंटकांनी केलेला हा हल्ला घृणास्पद आहे. अशा प्रकारे होणारे भ्याड हल्ले सुसंस्कृत महाराष्ट्राच्या इतिहासात काळिमा फासणारे आहे. या हल्ल्याच्या मागे असणाऱ्या खऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खांडगे यांनी केली.

आमच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळे या भ्याड हल्ल्याला सामोरे जाऊन त्यांनी चर्चा करावी, असे आवाहन करीत होत्या. महाराष्ट्रातील राजकारणाचा सुप्रियाताईंचा हा संस्कृतपणा आमचे भूषण आहे. यापुढे पवार साहेब किंवा दादा, सुप्रिया ताई यांच्या विरोधात असे कृत्य केले, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुसंस्कृतपणा विसरतील, असा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.