Pune News : फडणवीस यांच्याजवळ जाण्याची देखील प्रशांत जगताप यांची हिम्मत नाही – जगदीश मुळीक

एमपीसी  न्यूज – कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या घरासमोर आंदोलन करण्याचा भारतीय जनता पार्टीचा इतिहास नाही. काल  शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मी स्वतः जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचे आंदोलन हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. आजपर्यंत भाजपाने कोणत्याही नेत्याच्या घरासमोर अशा प्रकारे आंदोलन करण्याला पाठिंबा दिलेला नाही आणि केले नाही, असे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, की काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आंदोलन करताना त्यांचा तोल पूर्ण ढासळला आणि त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खोटे आरोप केले आणि कालच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या आंदोलनाच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप त्यांनी केला. मी त्यांना जाहीर आव्हान देऊ इच्छितो की त्यांनी केलेला आरोप ताबडतोब सिद्ध करावा अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे.

मागील सहा महिने चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कोणताही तोडगा काढू शकले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते हतबल झाले आहेत आणि विरोधी पक्षांवर ते बेछूट आरोप करत आहेत. एसटी बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल त्यांना दिसत नाहीत, परंतु आपल्या पक्षाचे अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करणं एवढेच काम त्यांचे चालू आहे.

ते पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपाच्या इतर नेत्यांच्या बद्दल काल  त्यांनी अत्यंत निषेधार्ह वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. याबद्दल आम्ही केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही. त्यांनी अथवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्याजवळ जायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांना योग्य तो धडा भाजपा कार्यकर्ते शिकवतील इशारा भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.