Talegaon : अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक चिटणीस गुरुवर्य विष्णू गोविंद तथा अण्णासाहेब विजापूरकर यांची 93 वी पुण्यतिथी तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्या संकुलात साजरी करण्यात आली. यानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन प्रमुख पाहुणे म्हणून तर अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे उपस्थित होते. तसेच राजेश म्हस्के, सुरेशभाई शहा, महेशभाई शहा, मुकुंदराव खळदे, दामोदर शिंदे, वसंतराव भेगडे, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे, गणेश खांडगे, विनायक अभ्यंकर आदी उपस्थित होते.

नवीन समर्थ विद्यालयातील ‘गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर फुलपाखरू उद्याना’चे यावेळी उद्घाटन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे लोकमान्य टिळक आदर्श शाळा पुरस्कार नवीन समर्थ विद्यालयाला देण्यात आला. गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर शिक्षक गौरव पुरस्कार नीला केसकर यांना तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर शिक्षकेतर गौरव पुरस्कार संजय कसाबी यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम सीबीएसई शाळेचा आणि नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च या महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे घडवावे, पालक म्हणून पाल्याशी कसा संवाद साधावा, याचा ऊहापोह करत यजुर्वेंद्र महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “प्रत्येकाने मोठे स्वप्न पाहणे आधी सुरू केले पाहिजे. त्यादृष्टीने विचार करून शंभर टक्के प्रयत्न केल्यास स्वप्न सत्यात उतरते. प्रत्येक स्वप्न साकार होण्यापूर्वी किंवा कोणतेही उद्दिष्ट सत्यात येण्यापूर्वी त्याचा विचार आधी होतो आणि मग कृतीतून ते साध्य होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना कृष्णराव भेगडे  यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किमान एक दिवसाचा पगार दीपस्तंभ फाउंडेशनला देणगी म्हणून देण्याचे आवाहन केले. तर यजुर्वेंद्र महाजन यांनी वर्षातून एकदा या संस्थेला भेट देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस संतोष खांडगे यांनी केले. आभार सहचिटणीस नंदकुमार शेलार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.