Pune : गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्ताने पुणे लष्कर भागातील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, नगरकिर्तन दरबार (मिरवणूक), वृक्षारोपण कार्यक्रम, लंगर (महाप्रसाद) अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शनिवार, ९ नोव्हेंबरला सकाळी ८.३०  वाजता गणेश पेठमधील श्री गुरुसिंग सभा गुरुद्वारापासून भव्य नगरकिर्तन दरबार (मिरवणूक) चे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक गणेश पेठ गुरुद्वारा, लक्ष्मी रोड, संत कबीर चौक, क्वार्टर गेट चौक बी. जे. मेडिकल ग्राउंड, साधू वासवानी रोड, पूना क्लब, खान रोडमार्गे पुणे रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे समाप्त होईल, अशी माहिती गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी, संतसिंग मोखा व विक्की ऑबेरॉय यांनी दिली आहे.

मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता विशेष मुलासाठी गुरुद्वारामध्ये दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर या मुलांना लंगर (महाप्रसाद) देण्यात येणार आहे. यामध्ये विविध सामाजिक संस्थांमधील अनाथ, अपंग, मतिमंद व कँसरग्रस्त मुले यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती मनजितसिंग विरदी फाऊंडेशनचे अध्यक्ष मनजितसिंग विरदी यांनी दिली.

या रक्तदान शिबिरात १२ नोव्हेंबरला  गुरुद्वारा गुरुनानक दरबारमध्ये दिवसभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रोटरी क्लब व राउंड टेबल क्लबतर्फे गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्ताने ५५० पिशव्या रक्त संकलित करण्यात येणार आहे. यासाठी आय एस आय रक्तपेढी, ससून सर्वोपचार रुग्णालय व रेडक्रॉस या रक्तपेढ्या विशेष सहकार्य करणार आहेत. हे रक्तदान शिबिर दिवसभर गुरुद्वारामध्ये चालणार आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच, १२ नोव्हेंबरला भाविकांना सकाळी ८ ते रात्री १ पर्यंत दिवसभर गुरुप्रसाद लंगरचा लाभ घेता येणार आहे.

साधू वासवानी मिशनच्या वतीने  १३ नोव्हेंबरला  दुपारी ४.३० ते सायंकाळी ५ च्या दरम्यान कीर्तन त्यानंतर सायंकाळी ५ ते ५.३० दरम्यान मूलमंत्र व आरदास व त्यानंतर चहा प्रसाद देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम इंटरनॅशनल एच जी पी सी च्यावतीने हे मूलमंत्र उच्चारण्यात येणार आहे.

एशियन आय हॉस्पिटल व डॉ. मुलानी आय हॉस्पिटलच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५५० मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, वर्षभर ५५०० वृक्षाचे वृक्षारोपण पुणे शहरात करण्यात येणार आहे.

तसेच गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथील दवाखान्यात वर्षभर अल्पदरात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये २० रुपयांमध्ये रक्त, लघवी सारख्या पथलॉजी तपासणी, २० रुपयात डिजिटल एक्सरे, ५० रुपयांत सोनोग्राफी तपासणी
करण्यात येणार आहे.

एफ टी आय आयमध्ये १५ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता कीर्तन व प्रवचन व लंगरचा कार्यक्रम तेथील विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी आयोजित करण्यात आला आहे. तसेच, वर्षभर पुणे शहरामधील विविध शाळा व महाविद्यालयामध्ये गुरुनानक यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, वर्षभरात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक ज्ञान स्पर्धा घेण्यात आली आहे.

गुरुनानक यांचा इतिहास व यात्रा या विषयावरील सिंधी , पंजाबी व मराठी भाषांमध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच गुरुनानक यांच्यावर स्पेशल विशेषांक पंजाबी, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेत प्रकाशित केले जाणार आहेत.

भारतीय संविधानुसार प्रत्येक धर्माला मुक्तपणे सवांद साधू शकतो. संविधानाच्या आर्टिकल २५/२बी नुसार शीख धर्मियांना कृपाण (शस्त्र) ठेवण्याचे मौलिक अधिकार दिले आहे. कुठल्याही आकाराचे कृपाण (शस्त्र) ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु विमानात प्रवास करताना ९ इंचापर्यंत कृपाण (शस्त्र) ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. द मोटार व्हेइकल अक्ट २०१९ शीख बांधवानी हेल्मेट ऐवजी फेटा / पगडी घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने १०००० मोफत कार्ड वाटप केले जाणार आहेत.

पुण्यात असा पहिल्यांदा उपक्रम गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्या वतीने राबविण्यात येत आहे. यास शीख बांधवानी प्रतिसाद देखील दिला आहे. सर्व धर्मियांना बरोबर घेऊन हा गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे. पुणे शहरात मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत शीख बांधव सहभागी होणार आहेत.

गुरुद्वारा परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुरुद्वापासून थोड्या अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून तेथून भाविकांना ने आण करण्यासाठी ३० ई रिक्षा मोफत ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच,गर्दी व सुरक्षेततेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक नेमण्यात आलेले असून गुरुद्वारांचे स्वयंसेवक देखील नेमण्यात आलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक व अपंग बांधवासाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक पोलीस देखील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष मदत करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.