Vikas Dube Encounter: कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा

Vikas Dube Encounter: Vikas Dube dies in police encounter near kanpur by up police गुरुवारी (दि.9) मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिरात विकास दुबेला अटक करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- नाट्यमय घडामोडीनंतर उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला. गेल्या आठवड्यात कानपूरमध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलिसांचे हत्याकांड विकास दुबेने घडवले होते. त्याला घेऊन जात असलेल्या वाहनाला अपघात झाल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांनी विकास दुबेला अटक करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. अखेर विकास दुबेला गुरुवारी (दि.9) मध्य प्रदेशमधील उज्जैन येथील महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्याला आज (दि.10) कानपूर येथील न्यायालयात हजर केले जाणार होते. त्यासाठी उज्जैन येथून कानपूरला नेत असताना नौबत्ता येथे त्याच्या वाहनाला अपघात झाला. त्यावेळी त्याने उत्तर प्रदेश एसटीएफ पोलीस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्वर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो ठार झाल्याचे सांगण्यात येते.


दरम्यान, पोलिसांनी विकास दुबेचा उजवा हात प्रभात मिश्रा याचाही गुरुवारी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला होता. त्यालाही कानपूरला नेले जात होते. पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, विकास दुबेच्या पत्नीला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ती सध्या कानपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.