World Cup 2023 : विराट कोहलीचे शानदार शतक! भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 327 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज:(विवेक कुलकर्णी) बर्थडे बॉय किंग कोहलीच्या (World Cup 2023 )विश्वविक्रमी 49व्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका संघापुढे 327 धावांचे विशाल लक्ष ठेवले आहे.

भारतातल्या सर्वात मोठया आणि ऐतिहासिक अशा कोलकाताच्या ईडन गार्डनवर नाणेफेकीचा कौल लागण्या नंतर रोहित शर्मा प्रथम फलंदाजी घेणार हे कोणालाही अनपेक्षित नव्हतेच आणि प्रथम फलंदाजी करताना रोहित स्फोटक फलंदाजी करणारच हे ही खात्रीपूर्वक सांगता येईल असेच वादादित सत्य होते आणि अगदी तसेच झाले सुद्धा. रोहीतने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी (World Cup2023)सुरू केली आणि संघाला नेहमीप्रमाणेच शानदार सुरुवात करून दिली.केवळ 24 चेंडूत दोन उत्तुंग पण तितकेच देखणे षटकार आणि 6 खणखणीत चौकार मारत त्याने घणाघाती 40 धावा केल्या, पण आजही तो या देखण्या आणि स्फोटक खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही.

Maval : मावळ तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी 77.84 टक्के मतदान

पण त्याने बाद होण्याआधी 36 चेंडूत 62 धावांची शानदार सलामी रचून संघालाही शानदार सुरवात करून दिली. तो बाद होताच मैदानावर टाळ्यांच्या कडकडाटात उतरला तो बर्थडे बॉय आणि किंग कोहली.आक्रमकता आकर्षकता,जबरदस्त मनोनिग्रह आदीचे सुरेख प्रदर्शन करणारी एक अविस्मरणीय खेळी करत त्याने आजचा आधीच खास असलेला दिवस आणखीनच खास करत त्याला विक्रमाचा बादशहा का म्हणतात हे सप्रमाण सिद्ध केले.

दुसऱ्या बाजूने खेळत असलेला गील आपल्या त्याच चिरपरिचित शैलीत आलाय आणि संपूर्ण भरात आलाय असे वाटत असतानाच केशव महाराजच्या एका अप्रतिम चेंडूवर चकला आणि निराश होत तंबूत परतला.मात्र त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने आजही आणखी एक अप्रतिम खेळी करत संघाला सावरलेच पण त्याचबरोबर सुस्थितीतही आणून ठेवले.

पहिल्या 26 चेंडूत केवळ 10 धावा काढणाऱ्या श्रेयसने नंतर जनता गाडीला एक्सप्रेसचे रूपडे लेववत एक अतिशय सुंदर खेळी केली, त्यामुळे संघाला तर गती मिळालीच,पण त्याच्या या फलंदाजीमुळे विराटवर जराही दडपण आले नाही, अगणित प्रेक्षकांच्या अपेक्षेचे ओझे तो मागील एका तपाहुन अधिक काळ झेलत आलाय म्हणा,त्याला कसले आलेय दडपण ,पण तरीही श्रेयसने केलेल्या खेळीचे मोल शब्दात मांडणे शक्य नाही, मात्र तो आजही शतकी खेळी करण्यात अयशस्वी ठरला.त्याने 87 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकार मारत 77 धावा केल्या, आणि त्याचसोबत विराटसह चौथ्या गडयासाठी 134 धावांची शानदार भागीदारीही केली.

त्यानंतर आलेल्या के एल राहुलला आज मात्र विशेष काही कामगिरी करता आली नाही. तो फक्त 8 धावा काढून बाद झाला,पण त्यानंतर आलेल्या सूर्यकुमारने छोटी पण नेहमीप्रमाणेच स्फोटक खेळी करुन संघाला मोठया धावसंख्येची आस दाखवली. तो भरात आलाय असे वाटत असतानाच डीकॉ कच्या एका शानदार झेलामुळे तो 22 धावा काढून तंबूत परतला, पण मैदानावर उपस्थित असलेल्या असंख्य प्रेक्षकांना त्याचे फारसे दुःख झाले नाही ,कारण यावेळी मैदानावर होता किंग कोहली. जागतिक विक्रमाला तो गाठत असताना त्याचे साक्षीदार होणाऱ्या अनगिणत प्रेक्षकांनी याची देही याची डोळा आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणजे काय ते आज खरोखरच कळाले.

फक्त 277 डावात 49 शतक करणाऱ्या विराटने आजच्या त्याच्या 35 व्या वाढदिवशी आपल्या आयडॉल असलेल्या सचिन रमेश तेंडुलकरला गाठले आणि आपले नाव त्याच्याबरोबर सुवर्णअक्षरात गोंदले.

आकडेवारी सर्व काही सिद्ध करत नाही हे मान्य केले तरी सचिनला हे शतके करण्यासाठी 450 हून अधिक सामने लागले होते हे आवर्जून सांगावे वाटते.आपल्या वाढदिवशी हे विक्रमी शतक करणाऱ्या कोहलीने आज असंख्य क्रिकेट रसिकांना परमोच्च आनंद दिला.त्याला साथ द्यायला आलेल्या जडेजाने अतिशय आक्रमक अंदाजात केवळ 15 चेंडूत नाबाद 29 धावा केल्याने भारतीय संघ आपल्या निर्धारित 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या, ज्याच्या जोरावर भारतीय संघ आजही आपल्या विजयी मार्गाने शानदार प्रवास करता राहिल असेच वाटत आहे.कोहलीने 121 चेंडूत 10 चौकार मारत नाबाद 101 धावा केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.