Wakad Crime News : ‘डेव्हलपर’ची साडेबारा लाखांची फसवणूक, तिघांना अटक

एमपीसी न्यूज – एका ‘डेव्हलपर’ची साडेबारा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मे 2017 ते एप्रिल 2021 दरम्यान कस्पटे वस्ती, वाकड येथील ‘ड्यू डेल’ सोसायटीत हा प्रकार घडला.

हरी दुधानी (रा. उल्हासनगर, ठाणे), मनिष नंदलाल (रा. नेरळ, नवी मुंबई) व रत्ना तरडेजा (रा. नेरळ, नवी मुंबई) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी विश्व डेव्हलपर्सचे विशाल अनिल ढोमसे (वय 43, रा. बाणेर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.25) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी ड्यू डेल सोसायटीचे चेअरमन असताना झालेल्या बैठकीत विश्व डेव्हलपर्सला सोसायटीतील मजल्याच्या विकासासाठी घेतलेली दहा लाख रुपये अनामत रक्कम ‘रिफन्डेबल’ असल्याचे सांगितले.

त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून विकसन करारनाम्याच्या दस्तामध्ये अनामत रक्कम ‘नॉन रिफन्डेबल’ असल्याचे लिहिले. त्यापोटी 15 लाख रुपये बिनव्याजी 18 महिन्यात परत देण्याच्या बोलीवर घेऊन त्यातील 12.5 लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.