Pimpri : मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे, शरद पवार वाणी समाजाच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार

लाडशाखीय वाणी समाजाचे महाअधिवेशन शनिवारी व रविवारी मारुंजी येथे

एमपीसी न्यूज – राज्यभर विखूरलेल्या समाजबांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने शनिवारी व रविवारी (दि. 24 व 25 नोव्हेंबर 2018) अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन मारूंजी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातून एैंशी हजारांहून जास्त सभासदांनी ऑन लाईन नोंदणी केली असून पन्नास हजारांहून जास्त समाज बांधव उपस्थित राहतील अशी माहिती महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी (पुणे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहकार्याध्यक्ष अनिल चितोडकर, खजिनदार शामकांत शेंडे, शामकांत कोतकर, प्रदेश युवक समन्वयक निलेश पूरकर, पुणे महानगर समन्वयक विवेक शिरोडे आदी उपस्थित होते.

मारुंजी, पुणे येथे शनिवारी (दि. 24 नोव्हेंबर) होणाऱ्या महाअधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात आयोजित केलेल्या ‘उद्योजकता संमेलनाचे’ उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 12:45 वाजता होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. मार्गदर्शन सत्रात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (समाज उभारणीत युवा वर्गाचा सहभाग), मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश (करिअर व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन), पर्सिस्टंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद देशपांडे (आय.टी.क्षेत्र काल, आज आणि उद्या), जेष्ठ उद्योजक सतीश मगर, संजीव बजाज, अनुज पुरी (बांधकाम व विपणन व्यवसाय भविष्यातील संधी), मनिष गुप्ता (यशस्वी उद्योजक, स्वप्ने व वेळेचे नियोजन), संजय पाटील, किशोर मासुरकर, सुरेश जाधव (औषध क्षेत्रात संधी व विकास) मार्गदर्शन करणार आहेत. उद्योजकता संमेलनाचा समारोप माजी मसूलमंत्री एकनाथ खडसे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.

रविवारी (दि. 25 नोव्हेंबर) सकाळच्या सत्रात प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे (समाजाचे संस्कार व एकीचे बळ), बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड (शेती व उद्योग व भविष्यातील संधी), भारतीय जैन संघटनेचे शांतीलालजी मुथा (एकीने समाजाचा विकास कसा साधाल) मार्गदर्शन करणार आहेत.

महाअधिवेशनाचा समारोप दुपारी 4:30 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राजू शेट्टी, श्रीरंग रणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. शनिवारी व रविवारी सायंकाळी 7 वाजता सायली चितोडकर, अमृता दहिवेलकर, मिस्त्रु बर्धन, संदीप उबाळे, जितेंद्र भुरुक, अश्विनी कुरपे, प्रशांत नासेरी, कोमल कनाकिया यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.