Talegaon dabhade News : तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषदेची प्रभाग रचनाही रद्द

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने प्रभाग रचना, निवडणूकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेली प्रभाग रचनाही रद्द झाली आहे. राज्य शासनाने त्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यामुळे आता नव्याने प्रभाग रचना केली जाणार असल्याने सहा महिने निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार केली होती. ती प्रभाग रचना प्रसिद्धही केली होती. नागरिकांकडून हरकती, सूचना मागविल्या होत्या. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केले. प्रभाग रचना, निवडणूकांच्या तारखा ठरविण्याचे अधिकार सरकारकडे घेतले.

त्या विधेयकावर राज्यपालांनीही स्वाक्षरी केली. त्यामुळे त्याचे कायद्यात रुपांतर झाले. त्यानुसार अधिसूचना प्रसिद्ध करत शासनाने नगरपरिषदेची प्रभाग रचना रद्द केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद प्रभागांची विभागणी करण्याची आणि त्यांच्या हद्दी विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया सुरु केलेली असेल. किंवा पूर्ण केली असेल. तेथे ती प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल असे शासनाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

निवडणूक आयोग काय म्हणतेय?

राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा/ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागांच्या सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम सुरू आहे.

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमामधील सुधारणे अन्वये प्रभाग रचना आता राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य शासनाने’ करावयाची आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेली प्रभाग रचनेची पुढील कार्यवाही यापुढे अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.