Shikshan Samwad :  ऑफलाईन परीक्षेचे आव्हान महाराष्ट्र पेलणार; अखेर मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ

दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना एमपीसी न्यूजकडून खूप साऱ्या शुभेच्छा!

एमपीसी न्यूज (डॉ. अ. ल. देशमुख) – दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात यावर बरीच चर्चा, वाद झाले. कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी बहुतांश शिक्षण ऑनलाईन घेतल्याने परीक्षाही ऑनलाईनच घ्याव्यात, असे काही पालकांचे मत होते. ऑफलाईन परीक्षांना विरोधही झाला. परंतु राज्यात दहावी आणि बारावीचे मिळून सुमारे ३० लाख विद्यार्थी असून त्यांची एकाच वेळी ऑनलाईन परीक्षा घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य नव्हते. अखेर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन ऑफलाईन परीक्षांचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यातच हित असल्याचा विचार केला.

अखेर या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यानुसार आता ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा होत आहेत. मंगळवार (दि. 15 मार्च)पासून ऑफलाईन पद्धतीने सुरू होत असलेल्या दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी समोरे जात आहेत.

विद्यापीठ व शाळांच्या परीक्षेच्या बाबतीत शासनाने परीक्षा न घेण्याविषयीचा विचार मांडला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परीक्षा घेतल्याच पाहिजेत, असा आदेश दिला होता. शिक्षणाचा व पर्यायाने विद्यार्थ्यांचा दर्जा राखण्यासाठी परीक्षा व्हायलाच पाहिजेत आणि त्या ऑफलाईनच असाव्यात, याला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने विचारपूर्वक घेतला.

इयत्ता दहावी आणि बारावी ही विद्यार्थ्यांच्या नवजीवनातील कारकिर्दीच्या किंवा भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची वर्षे असतात. त्यामुळे या इयत्तांच्या अभ्यासक्रमाच्या वार्षिक परीक्षा होऊन, त्यामधून मुलांची क्षमता दाखवणे आणि त्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेचे, आकलनाचे मूल्यमापन केले जाणे हे समंजसपणाचे लक्षण आहे. ही मुले जेव्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील तेव्हा त्यांच्या परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण केलेले असेल तर ‘कोरोना विद्यार्थी’ म्हणून त्यांच्यावर जो ठपका बसेल, त्यामुळे त्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता होती. याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज होती.

ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी होते सज्ज

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे यंदाचे संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षणामध्ये व्यतीत झाले. काही दिवस दहावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क झाला. ऑनलाईन क्लासेस असले तरीसुद्धा शिक्षकांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मनापासून शिक्षण दिले होते. विद्यार्थ्यांनीही दहावीचे वर्ष महत्त्वाचे आहे, हा विचार मनाशी दृढ करून स्वयंअध्ययनाने परीक्षेसाठीची उत्तम तयारी केलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याजवळ दहावीची पाठ्यपुस्तके होती.

पाठ्यपुस्तकांचे वाचन करून आकलन करण्याइतके हे विद्यार्थी नववी पर्यंतच्या शिक्षणातून तयार झालेले असतात. केवळ गणित आणि भौतिकशास्त्र याच विषयामध्ये संबोध समजण्याची गरज असते. बाकी सर्व विषयांची उत्तम तयारी करता येते आणि ती विद्यार्थ्यांनी केली.

एकूणांत ९० टक्‍के पालकांनी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे ९० टक्के विद्यार्थी आणि पालक दहावीची ऑफलाईन परीक्षेसाठी सज्ज होते. नकारात्मक बिचार घेऊन ओरडणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम दहा टक्के होती. परीक्षा ऑनलाईन घेतली काय किंवा ऑफलाईन घेतली काय, त्यांचा नकार ठरलेलाच होता.

राज्यात दहावी आणि बारावीचे मिळून सुमारे 30 लाख विद्यार्थी आहेत. या सर्वांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होते तसेच प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे वातावरण महत्त्वाचे असते. त्यानुसार परीक्षा ही परीक्षेच्या वातावरणातच व्हायला हवी. ते नसेल तर परिणामकारकतेवर परिणाम होतो. आपण एखादा खेळ खेळत असू, तर त्यासाठी सभोवताली वातावरण तसे असेल तर तो खेळ रंगतो. परीक्षेचेही तसेच आहे त्यामुळे योग्य ते नियम पाळून योग्य त्या वातावरणातच परीक्षा होणे आवश्यक असते.

परीक्षेची सकारात्मकता

राज्याच्या शिक्षणमंत्र्यानी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेणार, असे जाहीर केल्यानंतर काही नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला विरोध केला होता. शिक्षकांनीही बहिष्काराचे अस्त्र उपसले होते. परंतु, विद्यमान सामाजिक परिस्थितीमध्ये परीक्षांवर बहिष्काराचे अस्त्र न अवलंबता या परीक्षा आम्ही उत्तम पद्धतीने घेऊन दाखवू, हे आव्हान पेलण्याची वेळ आणि संधी होती.

कोरोनाची दहशत आता फारशी राहिलेली नाही. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थी या परीक्षा आता उत्तम पद्धतीने देऊ शकतील. या परीक्षा उत्तम पद्धतीने घेण्यासाठी आणि एकाही विद्यार्थ्याला संसर्ग होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक शहर, गावामधील त्या-त्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, परिसरातील सर्व डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते सज्ज राहिले आहेत. त्याचबरोबर आमची सर्व पातळ्यांवर तयारी आहे, असा जबरदस्त आत्मविश्वास व्यक्‍त केला होता.

दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. ही खूपच आनंदाची बाब आहे कारण या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा भविष्यकाळ सामावलेला आहे.

पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.