Pimpri : पुन्हा पाणीकपात, आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद 

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा शहरवासियांना फटका 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नियोजशून्य कारभाराचा फटका पुन्हा शहरवासियांना बसणार आहे. 9 ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे कारण देत आता पुन्हा पाणीकपात लादली जाणार आहे.  आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून पुढील आठवड्यात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.  दरम्यान, दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर केवळ सात दिवसाच्या आत आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागावार ओढावली आहे. 

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात आजमितिला 97.73  टक्के पाणीसाठा झाला आहे. काही दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

धरणात मुबलक पाणीसाठा झाल्याचे सांगत महापालिकेने पाच महिन्यांपासून सुरु असलेली पाणीकपात रद्द करत बुधवारी (दि. 7) पासून शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा सुरु केला. परंतु, पाण्याचे नियोजन कोलमडले. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. नियमित पाणीपुरवठा सुरु करताना प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे सात दिवसातच आपलाच निर्णय बदलण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागावर ओढावली आहे.

पाणी कमी आणि मागणी जास्त वाढल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. तसेच उंचावरील भागात जास्त दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे विभागनिहाय पाणीकपात केली जाणार आहे.

पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ‘पाणी कमी आणि मागणी जास्त झाली आहे. एकमद पाणी सोडल्यानंतर उंचावरील भागाला पाणी मिळत नाही. अत्यंत कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार  नियोजन करण्यात येत असून पुढील आठवड्यात त्याची अंमलबजावणी होईल’.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा दिवसाआड करावा किंवा त्यामध्ये बदल करण्याची, सूचना आयुक्तांना केली होती. त्यानुसार आठ दिवसातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाने त्याचे नियोजन सुरु केले असून पुढील आठवड्यापासून त्याची अमंलबजावणी होईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.