Talawade : ही कोंडी कधी सुटणार? तळवडे परिसरातील नागरिकांचा संतप्त सवाल

एमपीसी न्यूज – आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, सर्वाधिक कामगार वास्तव्य (Talawade) करीत असेलेला भाग अशा तिहेरी बंधनात तळवडे परिसर अडकला आहे. तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली या भागात हल्ली वाहतूक कोंडी नित्याची होऊ लागली आहे. देशाच्या प्रमुख आयटी पार्क पैकी एक असलेल्या हिंजवडी येथील वाहतूक कोंडीपाठोपाठ शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी तळवडे परिसरात होऊ लागली आहे. प्रशासनाकडून याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘ही कोंडी कधी सुटणार’ असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.

शहरालगत असणाऱ्या देहू आणि आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता हल्ली वाहतूक कोंडीने त्रस्त झाला आहे. चिखली, टॉवर लाईन, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, ज्योतिबा नगर, गणेश नगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार राहतात. हे कामगार राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत.

महाळुंगे, तळवडे, चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये काम करणारा कामगार वर्ग सहसा दुचाकीवरून तळवडे पार्कमार्गे कामावर जातो. ही दुचाकींची संख्या लक्षणीय आहे. इथे बाहेरून आलेल्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत स्थानिक वाहनांची संख्या अतिशय नगण्य आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गावरून चाकणकडे जाण्यासाठी भोसरी एवजी तळवडे येथून जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची संख्याही प्रचंड असते. आयटी पार्क मधील कामगारांची वाहने, कामगारांची ने-आण करणाऱ्या बसेस अशा सर्व प्रकारच्या वाहतुकीमुळे तळवडे येथील रस्त्यावर प्रचंड ताण येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी सुमारे चार ते सहा तास वाहतूक कोंडी ही नित्याची ठरली आहे. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग आणि वाहतुकीची गती एकसारखी राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे.

गणेश नगर येथे रस्त्याची मोजणी करण्यावरून रस्त्याच्या दोन्ही बाजूचे नागरिक न्यायालयात गेले. त्यातील एका बाजूचा निकाल लागला असून दुसऱ्या बाजूला निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे गणेश नगर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्ते खराब असल्याने वाहतुकीची गती कमी होत आहे.

भक्ती-शक्ती चौकातून सुरु होणारा स्पाईन रोड त्रिवेणीनगर येथे थांबला आहे. रस्त्यात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या (Talawade) विस्तापानाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. बाधित घरांना प्राधिकरणाकडून भूखंड दिले जात आहेत. भूखंड मिळणाऱ्या बधीताचे घर पाडून ते अधिग्रहित करण्याची प्रकिया सुरु आहे.

मात्र याला आणखी बराच वेळ जाण्याचाही शक्यता आहे. अतिक्रमण काढून रस्ता तयार करणे तसेच चौकात क्रॉसिंगसाठी अंडरपास अथवा उड्डाणपूल तयार करणे गरजेचे आहे. तरच त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत होईल. त्रिवेणीनगर कडून तळवडे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर ज्योतिबानगरसह ठिकठिकाणी ग्रेड सेपरेटर आवशयक आहेत. ते झाल्यास वाहतुकीची गती सुधारेल.

स्थानिक रहिवासी नरेंद्र भालेकर ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, “गणेशनगर कॉर्नरवरील रुंदीकरण रखडले आहे. रस्त्याबाबत न्यायालयात प्रकरण गेल्याने रस्त्याचे काम खोळंबले आहे. पालिकेने त्याची गांभीर्याने दखल घेऊन ते प्रकरण मार्गी लावल्यास नागरिकांना मदत होईल. गणेशनगर येथे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे पालिकेने आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे.

चाकण एमआयडीसीकडे जाणारे ट्रेलर रस्त्यात थांबल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. तळवडे-चिखली शिवेवरचा रस्ता झाल्यास फायदा होईल.”

तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे म्हणाले, “तळवडे गावठाण ते त्रिवेणीनगर दरम्यान गणेशनगर, ज्योतिबानगर, त्रिवेणीनगर येथे रस्ता अरुंद झाला आहे. संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी उपयोगात आणण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

डिव्हायडर पंक्चर कमी करणे, खड्डे भरून घेणे, रस्त्यावरील पार्किंग काढणे, अवजड वाहनांना वाहतुकीसाठी ठराविक वेळ नेमून देणे असे उपाय आम्ही करीत आहोत. मुंबईकडून तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी संरक्षण विभागाच्या जागेच्या बाजूने एक रस्ता होत आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यास 70 टक्के वाहतुकीवरील ताण कमी होईल. त्याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून तो करून घेणे गरजेचे आहे.”

 

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या उपाययोजना करता येतील –

जुना पुणे-मुंबई महामार्ग ते तळवडे हा मार्ग सुरु करणे.

तळवडे, चिखली शिव रस्ता सुरु करणे.

गणेशनगर येथील रस्त्याचे रुंदीकरण करणे.

डायमंड चौकातून मोई फाट्याकडे जाणारा मार्ग दुहेरी करून तो स्पाईन रोडला जोडावा.

भक्ती शक्ती चौकाकडून येणा-या स्पाईन रोडवरील त्रिवेणीनगर येथील काम पूर्ण करणे.

डिव्हायडर पंक्चर कमी करणे.

रस्त्यावरील खड्डे भरून घेणे.

रस्त्यावरील पार्किंग हटवणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.