Talegaon : यशस्वी उद्योजक झाल्यावर आपल्यासोबतच्या दहा मित्रांना उभे करा – हनुमंतराव गायकवाड

एमपीसी न्यूज – जीवनात आपल्याला काय करायचे आहे. याबाबतची ध्येयनिश्चिती महत्वाची आहे. ध्येय निश्चित असेल तर पुढील प्रवास करण्यास आत्मविश्वास येतो. ध्येय निश्चित करून जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जा. कष्ट करण्याची तयारी ठेवा. तसेच आपण यशस्वी उद्योजक झाल्यास आपल्यासोबतच्या दहा मित्रांना उद्योग जगतात भरारी घेण्यासाठी मदत करा. असे मत भारत विकास ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतर्फे इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘उद्योग व्यवसायातील संधी’ या विषयावरील व्याख्यानात हनुमंतराव गायकवाड बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष गोरख काळोखे, कार्यवाह रामदास काकडे, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, शैलेश शहा, दीपक शहा, राजेश मस्के, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, निरुपा कानिटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, क्रीडा स्पर्धात यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गायकवाड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हनुमंतराव गायकवाड म्हणाले की, पुढील बारा वर्षांत 10 कोटी लोकांचे जीवनमान बदलविण्याच्या दृष्टीने आम्ही उपक्रम राबवत आहोत. कर्करोगासह अन्य विविध आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विषमुक्‍त शेती करताना, उत्पादकता वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी अल्पदरात माती परीक्षण व पाणी परीक्षण करून दिले जात आहे. जे क्षेत्र निवडाल त्यात मनापासून प्रयत्न करा. जागतिक स्पर्धेत ज्ञानाची द्वारे खुली आहे. त्यासाठी प्रयत्न प्रामाणिक करायला पाहिजे. पैशा पेक्षा इतरांना सामाजिक सहकार्य केल्याचे आत्मिक समाधान फार मोठे आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवावी. आपण यशस्वी उद्योजक असाल तर आपल्या बरोबरच्या दहा सहकारी मित्रांना उभे करण्याचे काम आपण करायला हवं.”

गायकवाड यांनी त्यांचा अपयशाकडून यशाचा प्रवास उलगडून सांगत यशस्वी व्यवसायाच्या टिप्स देखील विद्यार्थ्यांना दिल्या. कुठलेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास बाळगावा. कामाचा दर्जा वाढवला पाहिजे. त्या दर्जात्मकतेमध्ये सातत्य ठेवायला हवे. प्रत्येक काम आपलं समजून करा. कधी अपयश आले तर खचून जाऊ नका. शिक्षण, संस्कार व आरोग्य या त्रिसूत्रीचा अवलंब करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. स्वतःमधील कौशल्य ओळखून अपयशानंतर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करा. स्पर्धेच्या युगात अपेक्षित बदल आत्मसात करावेत, असेही त्यांनी नमुद केले. सोबतच बीव्हीजीच्या आगामी काळात येऊ घातलेल्या विविध संकल्पनांविषयीची त्यांनी माहिती दिली.

उद्योगधाम तळेगाव संस्थेचे यतिन शहा, गुरूकुल प्रतिष्ठानचे मधुसूदन शिरोडकर, पाचाणे येथील आभाळमाया संस्थेच्या शांताबाई येवले यांना ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. व्याख्यानमालेचे प्रायोजक राजेश म्हस्के, ॲड रवींद्र दाभाडे, चंद्रभान खळदे, राहूल पारगे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, ॲड तुकाराम काटे, नंदकुमार शेलार, चंद्रकांत शेटे, दिनेश शहा, सागर पवार, विलास काळोखे आदी उद्योजकांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. वनमाला डोईफोडे यांनी केले. आभार गणेश भेगडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.