BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महिलांनी पिवळ्या रंगाच्या रेड डॉट पेट्यांमध्येच सॅनिटरी नॅपकीन टाकावे

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा गोळा करताना सॅनेटरी नॅपकीन स्वतंत्र गोळा करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या छोट्या टेम्पोंना पिवळ्या रंगाच्या रेड डॉट असलेल्या पेट्या बसविल्या आहेत. नागरिकांनी विशेषत: महिलांनी सॅनेटरी नॅपकीन या पेट्यांमध्ये टाकावेत, असे आवाहन घनकचरा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील जवळपास साठ टक्के घरातून घरोघरी जाऊन कचरा गोळा जातो. घरगुती कचर्‍यासोबत येणार्‍या सॅनेटरी नॅपकिनवर प्रक्रिया करता येत नाही. यासाठी महापालिकेने सॅनेटरी नॅपकिन आणि मेडीकल वेस्टचा कचरा जाळून नष्ट करण्यासाठी इन्सिनेटर बसविले आहेत. परंतू अन्य कचर्‍यासोबतच सॅनेटरी नॅपकिन येत असल्याने कचरा वेचक आणि कचरा रॅम्पवर विलगीकरणाचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना हे नॅपकिन हाताने बाजूला काढावे लागतात.

त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होतो. यासाठी महापालिकेने कचरा गोळा करणार्‍या टेम्पोलाच स्वतंत्ररित्या पिवळ्या रंगाच्या आणि त्यावर रेड डॉट असलेल्या पेट्या बसविल्या आहेत. महिलांनी घरातील कचरा टेम्पो चालकांना देताना सॅनेटरी नॅपकीन या पिवळ्या रंगाच्या पेटीत टाकल्यास विलगीकरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत होईल, असा या पेट्या बसविण्यामागील उद्देश असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.